"तुम्ही चुकीच्या व्यक्तीला प्रश्न विचारताय...", निज्जर हत्येच्या प्रश्नावर एस जयशंकर यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:31 AM2023-09-27T11:31:27+5:302023-09-27T11:32:04+5:30
भारत आणि कॅनडासह जगातील अनेक देशांमध्ये सध्या खलिस्तानची चर्चा जोरात सुरू आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. भारत आणि कॅनडासह जगातील अनेक देशांमध्ये सध्या खलिस्तानची चर्चा जोरात सुरू आहे.
दरम्यान, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित 'कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स' कार्यक्रमात भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते. यावेळी एका पत्रकाराने एस जयशंकर यांना खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबतचा गुप्तचर अहवाल द फाइव्ह आयजमध्ये शेअर करण्यात आला होता, त्याबद्दल विचारले. यावर एस जयशंकर यांनी फाइव्ह आयजचा भाग नसल्याचे सांगत तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारत आहात, अशी प्रतिक्रिया दिली.
एस जयशंकर म्हणाले, "मी द फाइव्ह आयजचा भाग नाही, मी एफबीआयचा भाग नक्कीच नाही. त्यामुळे मला वाटते की, तुम्ही चुकीच्या व्यक्तीला प्रश्न विचारत आहात." दरम्यान, 'फाइव्ह आयज' नेटवर्क ही एक गुप्तचर संघटना आहे, ज्यामध्ये युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. ही संघटना पाळत ठेवणे-आधारित आणि सिग्नल इंटेलिजन्स (SIGINT) दोन्ही आहे.
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर 18 जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर हरदीपसिंह निज्जर याची हत्या केल्याचा आरोप केला होता. यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटल्याचे पाहायला मिळत आहेत.