'मुंबईवरील 26/11चा हल्ला भारतानंच घडवून आणला'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 12:43 PM2018-05-14T12:43:34+5:302018-05-14T12:43:34+5:30
पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
नवी दिल्ली: मुंबईवरील 26/11 हल्ल्याबद्दल माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या विधानानं अडचणीत सापडलेल्या पाकिस्ताननं आता नवा कांगावा सुरू केला आहे. भारतानंच मुंबईवरील हल्ला घडवून आणला, असा अजब दावा पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी केला आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्यामागे भारताची गुप्तहेर यंत्रणा रॉचा हात आहे, असे अकलेचे तारेदेखील मलिक यांनी तोडले आहेत.
'26/11 चा हल्ला रॉने घडवून आणला. या हल्ल्याला पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा होता. काश्मीरमधील मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या घटनांकडे जगाचं दुर्लक्ष व्हावं, यासाठी हा हल्ला घडवून आणण्यात आला,' असं मलिक यांनी म्हटलं. या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नव्हता, असंदेखील ते म्हणाले. 'पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं. त्यांच्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा डागाळली जात आहे,' असं मलिक यांनी म्हटलं. नवाज शरीफ यांनी शनिवारी दिलेल्या मुलाखतीत मुंबई हल्ल्याबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं होतं. 26/11 चा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवून आणला, अशी कबुली शरीफ यांनी दिली होती.
नवाज शरीफ यांच्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की झाली. त्यामुळे शरीफ यांनी सारवासारव करत, भारतीय माध्यमांनी विधानाची तोडमोड करुन अर्थाचा अनर्थ केल्याचं म्हटलं. हाच संदर्भ देत, शरीफ यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, असं मलिक म्हणाले. 'स्टेट अॅक्टर्स आणि नॉन स्टेट अॅक्टर्स यामध्ये फरक आहे. शरीफ यांनी तो लक्षात घेण्याची गरज आहे. नॉन स्टेट अॅक्टर्स फक्त त्यांची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी पाकिस्तानचा वापर करतात,' असं मलिक यांनी म्हटलं.