अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांदरम्यान आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिलादेखील चालू आहे. या निवडणुकीत अनेक जुने मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा त्यांच्या प्रचारात वारंवार माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत आहेत. वास्तविक कृष्ण वर्णीय लोकांच्या अत्याचारांच्या आरोपावरून जनता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज आहे. माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळातही अशीच प्रकरणे पाहायला मिळाली होती. त्यांनी त्या सगळ्यावर मात करत विजय मिळवला होता, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. दरम्यान, अशा काही टेप(रेकॉर्डिंग) समोर आल्या आहेत, ज्यात निक्सन यांनी भारतीय आणि भारतीय महिलांवर अश्लील भाष्य केलं आहे.न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रिन्स्टन प्रोफेसर आणि लेखक गॅरी जे. बास यांनी या टेपचा हवाला देत असे म्हटले आहे की, निक्सन यांनी भारतीय महिलांसाठी बर्याच आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या होत्या. ही टेप त्या काळातील आहे, जेव्हा भारताचा सोव्हिएत युनियनकडे जास्त कल होता, तर पाकिस्तान राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या समर्थनार्थ होता.अहवालानुसार, या टेपमधून असे स्पष्ट होते की, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) हेनरी किसिंजरदेखील या संभाषणात सामील होते. निक्सन यांनी किसिंजरला या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. नोव्हेंबर 1971मध्ये इंदिरा गांधींसह व्हाईट हाऊसच्या संमेलनात खासगी विश्रांतीच्या वेळी निक्सनने किसिंजरला सांगितले, "टू मी, दे टर्न मी ऑफ." भारतीय महिला या जगातील अनाकर्षक आणि दयनीय महिला आहेत. तसेच त्यांना चापलुसी करण्याची चांगलं कौशल्य अवगत आहे. निक्सन येथेच थांबले नाहीत, त्यांनी किसिंजरला विचारले, मला सांगा ते दुसऱ्या व्यक्तीला कसे आकर्षित करत असतील. तसेच जून 1971मध्ये निक्सन, किसिंजर आणि व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ एच. आर. हेडलमनमधील संभाषणातूनही निक्सन यांची भारतीयांबद्दलची मानसिकता उघडकीस आली आहे. संभाषणादरम्यान त्यांनी असे म्हटले होते की, निःसंशयपणे जगातील सर्वात कुरुप भारतीय महिला असतात.
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी भारतीय महिलांबाबत केलं होतं आक्षेपार्ह विधान, टेपमधून उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 10:47 AM