पॅरिस : कोरोना साथीचा मोठा फटका बसलेल्या देशांपैकी फ्रान्स, स्पेनने लॉकडाऊनमधून काढता पाय कसा घ्यायचा व बेताबेताने नित्यक्रम कसे चालू ठेवायचे, याचे स्वतंत्र आराखडे मंगळवारी तयार केले आहेत. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांनी कोरोनाचा पूर्ण पाडाव केला आहे अशी लक्षणे दिसत आहेत. कोरोना साथीच्या नव्या हॉटस्पॉटमध्ये आता ब्राझीलचा समावेश झाला आहे.या साथीमुळे जपानने आॅलिम्पिकचे आयोजन पुढच्या वर्षी करण्याचे ठरविले आहे. कोरोनावर अजून प्रतिबंधक लस शोधून काढण्यात यश आलेले नाही. अशा स्थितीत या क्रीडास्पर्धा भरविणे योग्य होईल का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाऊन उठवून अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना कधी देणार व शाळा कधी सुरू करणार, असे दोन महत्त्वाचे प्रश्न सध्या युरोपीय देशांमध्ये विचारले जात आहेत. फ्रान्समध्ये ११ मे पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉ यांनी जाहीर केला. पण, त्याला काही शिक्षक, पालक व राजकीय नेत्यांनीच विरोध दर्शविला. शाळा सुरू होणार असल्या, तरी सध्याच्या स्थितीत तिथे आपल्या मुलांना पाठवायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी पालकांनीच घ्यायचा आहे, असे मॅक्रॉ यांनी म्हटले आहे. न्यूझीलंडमध्ये मंगळवारी कोरोनाचे तीनच रुग्ण आढळून आले.कोरोना हा फ्लू तापाच्या विषाणूसारखा आहे. त्याच्या साथीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्याची गरज नाही असे सांगणारे ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांच्या कारभारामुळे प्रतिबंधात्मक उपायांकडे काही काळ त्या देशाचे दूर्लक्ष झाले. त्याच्या परिणामी ब्राझिलमध्ये कोरोनाचा आता झपाट्याने प्रसार होत आहे.विमा कंपन्यांचा दबाव?लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढल्याने विमा कंपन्यांना त्यांच्या वेतनाची जबाबदारी घ्यावी लागते. तेथील सरकारनेच लॉकडाऊन शिथिल करण्याची घोषणा केल्याने विमा कंपन्यांवरील बेरोजगार वेतन देण्याचे दायित्व कमी होणार आहे. तसेच, अनेक रेस्टॉरंटच्या जागामालकांनी देखील लॉकडाऊन शिथिल केल्याने भाडे मागण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिथिलता दिलेली दुकाने सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केशकर्तनालय, कपड्यांची दुकाने, जिम, रेस्टॉरंटकाही प्रमाणात सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.>विविध शहरांत निर्बंध लागूब्राझिलमध्ये कोरोनाचे ६७ हजारपेक्षा अधिक रुग्ण असून ४६००पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. ही संख्या आणखीन वाढण्याची भीती आहे. राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो काहीही सांगत असले तरी तेथील विविध शहरांच्या महापौरांनी साथीला रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादले आहेत.
CoronaVirus: फ्रान्स, स्पेनचा लॉकडाऊन मागे घेण्याचा आराखडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:55 AM