पॅरिस, दि. 27 - तीन महिन्यांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इमॅन्युअल माक्रोन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि 39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले. पण इमॅन्युअल माक्रोन हे आपल्या चेह-याची जरा जास्तच काळजी घेतात असं वाटतं. कारण अध्यक्षपदी निवडून केवळ तीनच महिने झालेत आणि त्यांनी आतापर्यंत केवळ मेकअपवर 26,000 यूरो म्हणजे जवळपास 19 लाख 81 हजार 817 रुपये खर्च केले आहेत.
एका फ्रेंच मॅगझिनने गुरुवारी याबाबत खुलासा केला. इमॅन्युअल यांनी आपल्या कार्यकाळातील सुरूवातीच्या 100 दिवसात तब्बल 30 हजार डॉलर आफल्या मेकअपवर खर्च केले आहेत असं या मॅगझिनने म्हटलं. कहर म्हणजे खर्च केलेला हा सर्व पैसा हा करदात्यांचा होता. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.
इमॅन्युअल यांनी आपल्या खासगी मेकअप आर्टिस्टला दोन वेळेस पेमेंट केलं. यापैकी एका बिलाची किंमत 10 हजार युरो आणि दुस-या बिलाची किंमत 16 हजार युरो इतकी होती. अध्यक्षांच्या कार्यालयानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इमॅन्युअल यांच्या मेकअपवरील खर्चाबाबत आलेले वृत्त खरं आहे असं अध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटलं आहे. मात्र हा खर्च कमी करण्यात येईल, असेही कार्यालयाने म्हटले आहे.
ही माहिती समोर आल्यापासून इमॅन्युअल टीकाकारांचं लक्ष्य ठरले आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका होत आहे.
39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सुमारे 80 लाख 50 हजार 245 म्हणजेच एकूण मतदानापैकी 61.3 टक्के मते मिळवली होती. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांना 50 लाख 89 हजार 894 म्हणजे एकूण मतदानाच्या 38.7 टक्केच मते मिळवता आली. फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशाचे भावी राष्ट्रपती म्हणून माक्रोन यांचे नाव चर्चेत होते. अखेर अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्ष निवडणुकीतही माक्रोन यांनी बाजी मारली.काय म्हणाले होते विजयानंतर- माझ्या विजयाने ही फ्रान्सचा समृद्ध इतिहासामधील एका नवा अध्यायाची सुरुवात होत आहे. हा विजय एक आशा आणि विश्वास बनावा, अशी अपेक्षा मॅक्रॉन यांनी विजयानंतर व्यक्त केली होती. माजी बँकर असलेल्या माक्रोन यांचा जन्म उत्तर फ्रान्समध्ये 21 डिसेंबर 1977 रोजी झाला होता. माजी बँकर असलेल्या माक्रोन यांना 2012 साली तात्कालीन राष्ट्रपती ओलांद यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच 2014 साली त्यांनी फ्रान्स सरकारमध्ये वित्त मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. 2016 च्या अखेरीस फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले होते.