केप टाऊन - मुलीवर बलात्कार करणा-या आरोपींचा 56 वर्षीय महिलेने तीन किमीपर्यंत पाठलाग करुन चाकूने हल्ला केल्याची घटना दक्षिण अफ्रिकेत घडली आहे. महिलेने चाकूने हल्ला करत एका आरोपीची हत्या केली असून, दोघे हल्ल्यात गंभीर जखमी झाले. एकाची हत्या आणि दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी दक्षिण अफ्रिकेतील न्यायालयाने महिलेची निर्दोष सुटका केली आहे. महिलेची हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपातूनही सुटका करण्यात आली असल्याची माहिती बचावपक्षाच्या वकिलाने दिली आहे. घटना सप्टेंबर महिन्यातील आहे.
महिला बलात्कार पीडित तरुणीची आई असल्याने त्यांचं नाव उघड करण्यात आलेलं नाही. मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी इस्टर्न कोप प्रांतातील न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार केल्यानंतर महिलेची सर्व आरोपातून निर्दोष सुटका करण्याचा निर्णय घेतला.
दुसरीकडे हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही आरोपींना त्याच न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यांच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली खटला चालवण्यात येणार आहे. पीडित महिलेने अंगावर शहारे आणणारा तो अनुभव आठवत सांगितलं की, 'मी त्यांना पकडण्यासाठी जवळपास तीन किलोमीटर धावले. यावेळी मी सतत पोलिसांना फोन करत होते. पण कोणीही फोन उचलला नाही. यानंतर मी किचनमधून चाकू घेतला आणि बलात्का-यांच्या मागे धाव घेतली'.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात जमाइल सियाका याचा मृत्यू झाला, तर इतर दोन आरोपी जोलीसा सियाका आणि म्नेस्सिसी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.
पीडित तरुणीच्या आईने आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी आपण हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं आहे. आपण हल्ला केलेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नाहीये असंही त्या बोलल्या आहेत. मृत्यू झाल्याचं मला दुख: आहे, ही गोष्ट मला वारंवार सतावत आहे असं सांगत त्यांनी शोक व्यक्त केला. यावेळी त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी एखादी सुरक्षित जागा शोधावी अशी विनंती सामाजिक संस्थांना केली आहे.