गर्लफ्रेंडने एक पिशवी कचऱ्याच्या डब्यात फेकली, त्यात एवढी मौल्यवान वस्तू होती की त्यात तब्बल ५९०० कोटी रुपये होते. एका झटक्यात तिचा बॉयफ्रेंड कंगाल झाला आहे आणि आता त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ती पिशवी शोधण्यासाठी दारोदारी भटकत आहे.
युनायटेड किंग्डमची ही घटना आहे. त्या पिशवीत ८००० बिटकॉईन असलेला एक हार्ड ड्राईव्ह होता. या बिटकॉईनची आताची किंमत ५९०० कोटी रुपये आहे.
जेम्स नावाच्या तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. त्याची गर्लफ्रेंड हैल्फिना एडी इवांसने सांगितले की घराची साफसफाई करत असताना हे झाले आहे. जेम्सनेच मला कचऱ्याची पिशवी फेकायला सांगितली होती. मला त्यात काय आहे ते माहिती नव्हते. आता तो झालेल्या नुकसानासाठी मला जबाबदार धरू शकत नाही.
जेम्स ती हार्ड ड्राईव्ह मिळविण्यासाठी आता विविध कार्यालयांच्या दारोदारी फिरत आहे. न्यूपोर्ट शहराच्या कचरा केंद्रात ती बॅग गेली आहे. १ लाख टन कचऱ्याखाली ती बॅग कुठेतरी असणार आहे. एवढा मोठा कचरा कोणीही उपसण्याची तसदी घेत नाहीय. तरीही जेम्सने पराभव स्वीकारलेला नाही. जेम्सने न्यूपोर्ट सिटी कौन्सिल विरुद्ध 495 दशलक्ष पौंड (सुमारे 4,900 कोटी रुपये) साठी खटला दाखल केला आहे. प्रशासन कचऱ्याच्या ढिगाऱ्यापर्यंत पोहोचू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जेम्स म्हणाले, 'या खजिन्याची किंमत दररोज वाढत आहे. मला ते मिळवावे लागेल.'
जर ही रक्कम मिळाली तर त्याच्या १० टक्के भागाचा वापर न्यूपोर्टला जगातील चांगले शहर बनविण्यासाठी करणार असल्याचे वचनही यात जेम्सने दिले आहे.