४२ वर्षीय गोलरिझ घाहर्मन या न्यूझीलंडच्या संसद सदस्य आहेत. त्या न्यूझीलंडच्या राष्ट्रीय राजकारणातील काहीशा डावीकडे झुकलेल्या विचारसरणीच्या ग्रीन पार्टीच्या सदस्य आहेत. गोलरिझ या त्या पार्टीच्या कायदाविषयक प्रवक्त्यादेखील आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या कपड्यांच्या महागड्या बुटिक्समधून तीन वेळा कपडे चोरल्याचा आरोप करण्यात आला. यापैकी एक घटना ऑकलंड या शहरातील महागड्या कपड्यांच्या दुकानातील आहे, तर दुसरी घटना वेलिंग्टन हाय एन्ड क्लोथ्स रिटेलर या दुकानातील आहे. या तीनही घटना २०२३ सालच्या उत्तरार्धात घडल्या, असा गोलरिझ यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर गोलरिझ घाहर्मन यांनी त्यांच्या संसदेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देतेवेळी गोलरिझ म्हणाल्या “माझ्या या कृत्याचं मी समर्थन करणार नाही. पण, अति ताणामुळे हे माझ्याकडून घडलं आहे.”
अति ताणामुळे असं काहीतरी कृत्य करावं, असा कुठला ताण गोलरिझ यांच्यावर आहे? गोलरिझ यांचा जन्म इराणमधला. त्या लहानपणी त्यांच्या आई - वडिलांबरोबर इराणमधून पळून न्यूझीलंडमध्ये आल्या. त्यांच्या आई - वडिलांनी न्यूझीलंडमध्ये राजकीय आश्रय मागितला. एखाद्या कुटुंबाला ज्यावेळी जीव वाचवण्यासाठी आपल्या देशातून दुसऱ्या देशात पळून जाण्याची वेळ येते, त्यावेळी त्या कुटुंबात अनेक उलथापालथी झालेल्या असतात. तो सगळा प्रवासच अनिश्चिततेने भरलेला असतो. आपला देश, आपली माणसं, आपली संस्कृती, आपलं सगळं आयुष्य मागे सोडून यायचं; त्यात नवीन देश आपल्याला स्वीकारेल की नाही, ते माहिती नाही. त्या देशाने नाकारलं तर काय करायचं, हे माहिती नसतं, अशी परिस्थिती असते. गोलरिझ यांच्या कुटुंबीयांना सुदैवाने न्यूझीलंडने राजकीय आश्रय दिला. मात्र, इराणसारख्या बंदिस्त सांस्कृतिक देशातून न्यूझीलंडसारख्या तुलनेने मोकळ्या संस्कृतीत जगायला शिकणं, हाही एक कठीण प्रवास या कुटुंबाने पार पाडला.
मोकळ्या विचारांच्या देशात लहानपणापासून राहायला मिळाल्याचा पूर्ण फायदा गोलरिझ यांनी घेतला. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. ते पूर्ण केल्याच्या नंतर संयुक्त राष्ट्रसंघासाठी मानवाधिकार विशेषज्ञ वकील म्हणून काम केलं. आंतरराष्ट्रीय फौजदारी लवादांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंडच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. ग्रीन पार्टीबरोबर काम करायला सुरुवात केली. त्या २०१७ साली संसदेवर निवडूनदेखील आल्या. न्यूझीलंडमध्ये राजकीय आश्रय घेतलेल्या व्यक्तींपैकी संसदेत निवडून आलेल्या गोलरिझ या पहिल्या!
मात्र, त्यांचा पुढचा प्रवास कठीण ठरला. त्यांच्यावरील चोरीचे आरोप जाहीर होण्याच्या आधी त्यांच्यावर पॅलेस्टाइनच्या बाजूने होणाऱ्या निदर्शनात भाग घेतल्याबद्दल खूप टीका झाली. ग्रीन पार्टीचे एक नेते जेम्स शॉ म्हणतात की, गोलरिझ यांच्या संसदेतील संपूर्ण सहा वर्षांच्या काळात त्यांच्यावरील ताण सतत वाढताच राहिलेला आहे. त्यात कामाचा ताण हा एक भाग आहेच. मात्र, त्याचबरोबर आशियाई वंशाची महिला असल्यामुळेही त्यांच्यावर एक वेगळ्या प्रकारचा ताण आहे. जेम्स शॉ म्हणतात, “गोलरिझ निवडून आल्या दिवसापासून त्यांना लैंगिक हिंसेच्या, शारीरिक हिंसेच्या, इतकंच नाही तर ठार मारण्याच्यादेखील धमक्या सतत मिळत आहेत. तुम्ही जर सतत इतक्या तणावाखाली जगत राहिलात आणि काम करत राहिलात तर त्याचे कुठले ना कुठले परिणाम तुमच्यावर होतील हे तर उघडच आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर पराकोटीचा ताण आहे हे लक्षात आलं आहे आणि त्यांनी ते मान्य केलं आहे, याबद्दल मला त्यांचं कौतुक आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते.”
गोलरिझ म्हणतात, “माझ्यावर असलेल्या ताणामुळे मी अशी काही कृत्य केली आहेत, जी मी एरवी कधीच केली नसती. त्या कृत्यांचं समर्थन होऊच शकत नाही. मात्र, हे माझ्याकडून का घडलं, याबद्दल मी स्पष्टीकरण देऊ शकते. मी आत्ता ज्या मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेते आहे. ते म्हणतात की, माझं सध्याचं वागणं, हा पराकोटीचा ताण आणि पूर्वीचा त्यावेळी लक्षात न आलेला मानसिक धक्का यांचा एकत्रित परिणाम आहे. मी माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचा अपेक्षाभंग केला आहे आणि त्याबद्दल मी त्यांची माफी मागते. माझ्या वागणुकीचं कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही!’
राजीनामा तर दिला; पण...सततचा मानसिक ताण आणि या चोरीच्या घटनांमुळे गोलरिझ यांनी अखेर संसद सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र, या राजीनाम्यामुळे त्यांच्या विषयातील एक वेगळा दृष्टिकोन आणि एकाकी आवाज हरवल्याची भावना ग्रीन पार्टीच्या सदस्यांनी व्यक्त केली. त्या म्हणतात, ‘वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं आहे, की माझी तब्येत सध्या बरी नाही’.