नवी दिल्ली: भारताच्या कारवाईच्या भीतीनं पाकिस्ताननंजैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवली आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारनं हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची माहिती पंजाब सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली. मौलाना मसूद अजहरदेखील याच मुख्यालयात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुलवामा हल्ल्याप्रकरणी भारतीय सैन्य कारवाई करु शकतं, अशी भीती पाकिस्तानला वाटते. त्यामुळेच जैशच्या मुख्यालयाला कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मदरसतुल शबीर आणि जामा-ए-मस्जिद सुभानअल्ला भागाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती 'गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान' या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली. एका प्रवक्त्यात्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आली. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जैशच्या मुख्यालयाशी संबंधित प्रकरणं हाताळण्यासाठी एका प्रशासकाची नियुक्तीदेखील करण्यात आली. याबद्दलचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली काल राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली होती.
पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती; जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 9:28 PM