हाफीज सईद नजरकैदेतून सुटणार, न्यायालयाने दिले सुटकेचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:25 AM2017-11-23T04:25:13+5:302017-11-23T04:25:28+5:30
लाहोर : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-ऊद-दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश बुधवारी न्यायालयाने दिले.
लाहोर : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-ऊद-दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश बुधवारी न्यायालयाने दिले. मुंबई हल्ल्यातील अपराध्यांना शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असलेल्या भारताला यामुळे धक्का बसला आहे. या वर्षी जानेवारीपासून सईद अटकेत होता. सईद याच्यावर त्याने केलेल्या दहशतवादी कारवायांबद्दल अमेरिकेने १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही जाहीर केलेले आहे. हाफीज सईदची स्थानबद्धता आणखी तीन महिन्यांनी वाढवावी ही सरकारची मागणी पंजाब प्रांताच्या न्यायालयीन आढावा मंडळाने फेटाळली. या मंडळात लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समावेश होता.
सईदच्या ३० दिवसांच्या स्थानबद्धतेची मुदत येत्या दोन दिवसांत संपत असून, ती संपताच त्याला सोडण्याचे आदेश मंडळाने दिले. सईद जर आणखी कोणत्या खटल्यात हवा नसेल, तर त्याला सोडून देण्यात यावे, असे सरकारला सांगण्यात आले. मंडळाचे प्रमुख न्यायमूर्ती अब्दुल सामी खान होते. सरकारने जर त्याला इतर कुठल्याही खटल्यात ताब्यात घेतले नाही, तर दोन दिवसांत त्याची सुटका होईल. या निर्णयानंतर सईद म्हणाला की, मी काश्मीरच्या लढ्याला पाठिंबा देत असल्यामुळे भारत माझ्या मागे लागला आहे. भारताचे सगळे प्रयत्न फसले असून, माझी सुटका होणार आहे, असे सईद याने जमात ऊद दावाच्या टिष्ट्वटरवर टाकलेल्या छोट्याशा व्हिडीओमध्ये म्हटले. मुंबई हल्ल्याचा फेर तपास करावा व दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर सईद आणि लश्कर ए तय्यबाचा प्रमुख झकीऊर रहमानवर खटले भरावेत, अशी मागणी भारताने वारंवार केलेली आहे.