हाफिज सईदला आम्ही दहशतवादीच समजतो, पाकनं कारवाई करावी, अमेरिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 02:35 PM2018-01-19T14:35:17+5:302018-01-19T14:37:24+5:30
मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदची तळी उचलल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांना अमेरिकेनं खडे बोल सुनावले आहेत.
वॉशिंग्टन- मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदची तळी उचलल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांना अमेरिकेनं खडे बोल सुनावले आहेत. हाफिज सईदला आम्ही दहशतवादी समजतो, त्यामुळे पाकिस्ताननं त्याच्यावर कारवाई करावी, असं विधान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉर्ट यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला 'साहेब' असे संबोधले होते. एवढ्यावरच न थांबता त्यांनी हाफिज सईद साहेबांविरोधात पाकिस्तानात कोणताही गुन्हा दाखल नाही, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. पाकिस्तानमधल्या जिओ टीव्हीनं काल घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मुक्ताफळं उधळली होती. हाफिज सईद साहेबांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यानं आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू शकत नाही. कोणी तरी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्यास आम्ही कारवाई करू शकतो, असंही शाहीद खकान अब्बासी म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं पाकिस्तानला इशारा दिला आहे. हाफिज सईदवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी, असंही हिथर नॉर्ट यांनी सुनावलं आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले होते. मात्र पाकिस्तानमध्ये राजकारणी आणि लष्कराकडून त्याला अद्यापही पाठिंबा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी हाफिझ सईदची बाजू घेतल्यानंतर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हाफिस सईदची तळी उचलताना त्याने प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणेच काश्मीर समस्या सोडवण्यासाठी सक्रिया भूमिका घेतली आहे, असे बाजवा यांनी म्हटले होते.