हाफिज सईदचे २00 समर्थक पाकमध्ये निवडणूक लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 04:01 AM2018-06-10T04:01:39+5:302018-06-10T04:01:39+5:30
पाकिस्तानात २५ जुलै रोजी होणाऱ्या संसदेच्या निवडणुकांत मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लश्कर-ए-तय्यबा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा अल्लाहू-अकबर तहरीक दुसºया संघटनेतर्फे २००हून अधिक उमेदवार उभे करणार आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानात २५ जुलै रोजी होणाऱ्या संसदेच्या निवडणुकांत मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लश्कर-ए-तय्यबा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा अल्लाहू-अकबर तहरीक दुसºया संघटनेतर्फे २००हून अधिक उमेदवार उभे करणार आहे. हाफिज सईद हा स्वत: निवडणूक लढणार नाही.
निवडणुकांसाठी अलीकडेच हाफिज सईदने मिल्ली मुस्लीम लीग नावाचा पक्ष स्थापन केला. हा पक्ष म्हणजे जमात-उद-दावाचा भाग आहे. पण मिल्ली मुस्लीम लीग या पक्षाची पाकिस्तानातील निवडणूक आयोगाने अद्याप नोंद केलेली नाही. त्यामुळेच हाफिज सईदने या निवडणुका अल्लाहू-अकबर तहरीकतर्फे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्ष नोंदणीकृत आहे.
मात्र या पक्षातर्फे सईदच्या जमात-उद-दावाचेच समर्थक व नेतेच निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी मिल्ली व मुस्लीम लीगचे सैफुल्ला खलिद व एएटीचे अध्यक्ष अहमद बरी यांच्यात समझोता झाला आहे. त्यामुळे हाफिजचे हे सारे समर्थक एएटीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. हाफिजने मात्र स्वत: निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तो आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहे. प्रचारास वेळ मिळावा, यासाठीच त्याने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, असे सांगण्यात येत आहे. आपले अधिकाधिक उमेदवार
निवडून आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)
दोन्ही संघटना दहशतवादी
हाफिज सईदच्या लश्कर-ए-तय्यबा व जमात उद दावा या दोन्ही संघटनांना संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेने तर हाफिज सईदलाच आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले असून, त्याच्या अटकेसाठी १ कोटी डॉलरचे बक्षीसही लावले आहे. मध्यंतरी त्याला पाकिस्तानातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
मुशर्रफही उतरणार निवडणूक रिंगणात
पेशावर हायकोर्टाने पाच वर्षांपूर्वी घातलेल्या आजन्म बंदीस सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने जनरल परवेज मुशर्रफ ही निवडणूक खैबर पुक्तुन्ख्वा प्रांताच्या चित्राल जिल्ह्यातून आणि कदाचित कराची शहरातून लढवतील, असे त्यांच्या आॅल पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाचे सरचिटणीस मोहम्मद आझम यांनी सांगितले.