या देशात हल्लेखोरांनी राष्ट्रपतींची घरात घुसून केली हत्या, पत्नीही गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 07:54 PM2021-07-07T19:54:51+5:302021-07-07T19:55:40+5:30
Haiti President Assassinated: हैती या देशामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मोईसी यांची हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या करण्यात आली आहे.
हैती - हैती या देशामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मोईसी यांची हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. हैतीचे हंगांमी पंतप्रधान क्लॉड जोसेफ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ही घटना बुधवारी पहाटे घडली. हल्लीच गेल्या काही महिन्यांपासून राजधानीमध्ये दोन समुहांमध्ये हिंसाचार वाढल्याने देशात तणावपूर्ण वातावरण आहे. (Assassination of Haiti President Jovenel Moïse, wife seriously injured in attack)
पंतप्रधानांनी सांगितले की, काही अज्ञात लोकांनी हा हल्ला घडवून आणला. त्यातील काही हल्लेखोर हे स्पॅनिश भाषेत बोलत होते. त्यांनी राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थानावर हल्ला केला आणि राष्ट्रप्रमुखांना गंभीररीत्या जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात राष्ट्रपतींच्या पत्नीलाही गोळी लागली. मात्र त्यांचे प्राण वाचले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशाच्या राजधानीमध्ये एका मुख्य रस्त्यावर झालेल्या गोळीबारात सुमारे १५ लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एक पत्रकार आणि एका राजकीय कार्यकर्त्याचाही समावेश आहे.
राष्ट्रीय पोलीस प्रमुख लिओन चार्ल्स यांनी सांगितले की, हा गोळीबार झाला त्यापू्र्वी काही तास आधी असंतुष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या एका समुहाच्या प्रवक्त्याची त्याच भागात हत्या करण्यात आली. या समुहाला फँटम ५०९ च्या नावाने ओळखले जाते. त्यांना या सामुहिक हत्येसाठी फँटम ५०९च्या सहकाऱ्यांना जबाबदार ठरवले. मात्र कुठलाही पुरावा मिळाला नाही.