मुंबई- दीपावलीचा सण जसा हिंदूधर्मियांमध्ये आनंदाने साजरा केला जातो तसाच एक सण ज्यू धर्मियांमध्येही साजरा केला जातो. हनुक्का या नावाने साधारणत: डिसेंबर महिन्यात हा सण जगात सर्वत्र पसरलेले ज्यू मोठ्या आनंदाने साजरा करतात. उद्यापासून हा सण सुरु होत आहे.
इसवी सन पूर्व १६५ मध्ये ज्यूंनी ग्रीक आणि सीरियन आक्रमकांना युद्धामध्ये हरवल्यानंतर आपल्या देवळाला पुन्हा पावित्र्य प्राप्त करुन देण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी सलग आठ दिवस दिवा तेवत ठेवायचे ठरवले पण दुर्देवाने केवळ एकच दिवस पुरेल एवढे तेल त्यांच्याकडे शिल्लक होते. मात्र प्रत्यक्ष दिवा प्रज्ज्वलित केल्यावर हे केवळ एका दिवसाला पुरणारे तेल त्यांना आठही दिवस पुरले. या दैवी चमत्कारामुळे ज्यू हनुक्काचा सण भक्तिभावाने साजरा करतात. आजही प्रत्येक दिवशी एक अशा आठ मेणबत्त्या किंवा दिवे या काळात प्रज्ज्वलित केल्या जातात. या दिवे किंवा मेणबत्त्यांच्या स्टँडला 'मेनोरा' असे म्हटले जाते. काही ठिकाणी या स्टँडवर नऊ मेणबत्त्यांची सोय असते. या मेणबत्तीने सर्व आठ मेणबत्त्या पेटवल्या जातात. घरे किंवा इतर इमारतींमध्ये हा मेनोरा दर्शनी भागात खिडकीमध्ये ठेवला जातो.
भारतात कोकण किनाऱ्यावर नवगांव येथे ज्यू उतरले. उत्तर कोकणात राहणाऱ्या लोकांप्रमाणे, समाजजीवनामध्ये मिसळून व्यवहार करत, शांततामय सहजीवनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. या कालावधीत त्यांनी शनिवारी सुट्टी (शब्बाथ) घेण्याची, ज्यूंचे पवित्र दिवस साजरे करण्याची आणि तेलबियांपासून तेल काढण्याचे कौशल्य जपले. तेल गाळण्याच्या त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना 'शनवार तेली' (कारण ते शनिवारी सुट्टी घ्यायचे) असे नावही मिळाले. १८ व्या शतकामध्ये ज्यू बांधव हळूहळू मुंबईमध्ये स्थायिक होऊ लागले. इस्रायलची निर्मिती झाल्यावर, ३0 हजारांहून अधिक लोकांनी इस्रायलला स्थलांतर केले. आज मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये ५००० च्या आसपास ज्यू शिल्लक राहिले आहेत. विवाह, प्रार्थना, सण, समारंभ अशा माध्यमांतून एकत्र येणे, सुख-दु:खात सामील होत, त्यांनी आपल्या परंपरा जपल्या आहेत. दरवर्षी रोश हाशन्ना, योम किप्पूर, हनुक्का हे सर्व सण ते साजरे करतात.
हनुक्का आनंदाचा क्षण - एडना सॅम्युएल हनुक्काचे दिवस हे अत्यंत आनंदाचे दिवस असतात. दररोज एक दीप असे सर्व दीप आठ दिवसांत प्रज्ज्वलित केले जातात. संध्याकाळी विशेष गाणी गाणे, तळलेले पदार्थ, गोड पदार्थांचा आस्वाद घेणे अशाप्रकारे हे दिवस साजरे होतात. मुंबई आणि परिसरातील बेने इस्रायली बांधवांनी ही प्रथा अजून जपलेली आहे. यामध्ये संध्याकाळी दीप प्रज्ज्वलन करुन प्रार्थना करुन हलवा किंवा पुडिंगचा आस्वाद घेतला जातो.