कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रत्येक देश आपापल्यापरीने प्रयत्न करतोय. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जातेय. जगातले सर्वच शास्त्रज्ञ यावर संशोधन करताहेत. कोरोनावरची लस अजूनही सापडली नसल्याने त्याचा नायनाट करता येणार नाही, पण कोरोनाला कसं रोखता येईल, नागरिकांना त्यापासून कसं दूर राखता येईल यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर जगभरात सुरू आहेत.अर्थातच कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व तंत्रज्ञानाचा खूप मोठा आधार मिळतोय. संयुक्त अरब अमिरातीने आता यावर आपल्यापरीने उपाय शोधला असून, त्यासाठी स्मार्ट हेल्मेट्सचा वापर त्यांनी सुरू केला आहे. काय उपयोग आहे या हेल्मेट्सचा? त्यानं कोरोनाला आळा कसा बसणार?..यासंदर्भात तिथल्या पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे, आम्ही जी स्मार्ट हेल्मेट्स आता वापरतोय, त्याचा आम्हाला खूपच उपयोग होतोय. या हेल्मेट्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माध्यमातून लोकांचा ताप मोजणं खूपच सोपं झालं आहे. ताप मोजण्यासाठी मुख्यत: थर्मामीटरचा वापर केला जातो, पण या हेल्मेट्सच्या माध्यमातून एकाच वेळी तब्बल दोनशे लोकांचा ताप मोजता येणं शक्य झालं आहे. तेही केवळ एका मिनिटांत! तब्बल १६ फूट अंतरावरूनही हेल्मेट्स शरीराच्या तापमानाची नोंद करू शकतात!यासंदर्भात पोलीस प्रशासनातील अधिकारी अली अल रामसे यांचं म्हणणं आहे, दुबईमधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ही हेल्मेट्स ठेवली आहेत. याशिवाय जे पोलीस फ्रंटलाइनवर काम करतात, कायम लोकांच्या संपर्कात असतात त्यांच्यासाठी प्रत्येक पेट्रोलिंग स्टेशनवर ही हेल्मेट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.कुठल्याही व्यक्तीत तापाची लक्षणं आढळली की, त्याला ताबडतोब अडवून, पुढे जाण्यापासून रोखलं जातंय. त्याला तपासणीसाठी पाठवलं जातंय. ज्या ठिकाणी नागरिकांची घनता जास्त आहे आणि कोरोनाचे रुग्ण ज्या भागात मोठ्या संख्येने आहेत, मुख्यत्वे तिथे या हेल्मेट्सचा वापर केला जातोय. आखाती देशांमध्ये कोरोना प्रसारात संयुक्त अरब अमिरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांच्याकडे बाधितांची संख्या ११,३८० होती, २१८१ रुग्ण बरे झाले होते, तर ८९ नागरिक आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत. स्मार्ट हेल्मेट्समुळे कोरोनाचे रुग्ण शोधून काढण्याचं आमचं काम बरंचसं सोपं झालं आहे, असं पोलीस व आरोग्य प्रशासनाचं म्हणणं आहे.अर्थात ही हेल्मेट्स संयुक्त अरब अमिरातीत तयार झालेली नाहीत. चीनमधून ती आयात करण्यात आली आहेत. या हेल्मेट्सची निर्मिती करणाºया ‘केसी वेअरेबल’ या कंपनीचं म्हणणं आहे, या हेल्मेट्ससाठी आमच्याकडे मध्य पूर्व, युरोप आणि आशिया खंडांतून मोठी मागणी आहे..
CoronaVirus: रुग्ण शोधणारं हेल्मेट, १६ फुटांवरून मिनिटांत कळेल दोनशे जणांचा ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:02 AM