लंडन, दि. 17 - युकेमध्ये एका हिंदू महिलेने आपल्या ज्यू मैत्रिणीशी लग्नगाठ बांधली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युकेमधील हा पहिलाच आंतरधर्मीय समलैंगिक विवाह आहे. 48 वर्षीय कलावती मिस्त्री आणि मिरिअम जेफरसन यांची 20 वर्षापुर्वी अमेरिकेतील एका ट्रेनिंग कोर्सदरम्यान ओळख झाली होती. मिरिअम जेफरसन मूळच्या टेक्सासच्या आहेत. गेल्याच आठवड्यात दोघींनी लग्न करुन एकमेकांसोबत उर्वरित आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचादोन समलिंगी तरुणींचा आत्महत्येचा प्रयत्नसमलिंगी दाम्पत्यास भाडोत्री मातृत्वाने तिळे!गे पतीपासून दुस-यांदा झाला गरोदर
लग्नासाठी दोघींनीही एकदम पारंपारिक कपडे घातले होते. लग्नासाठी विशेष तयारीही करण्यात आली होती. फुलांच्या सजावटीत दोघींचा विवाहसोहळा पार पडला. गळ्यातील मंगळसूत्र आता त्या विवाहित आहेत याची साक्ष देत होत्या.
कलावती मिस्त्री यांना फार आधीच आपल्याला पुरुषांमध्ये रस नसल्याची जाणीव झाली होती. मात्र आपला धर्म, जात, कुटुंब यासाठी परवानगी देणार नाही याच्या भीतीने त्यांनी आपलं हे गुपित उघड करण्याची हिंमत कधीच केली नाही. आशियात राहणा-या एखाद्या गे महिलेसाठी हे खूपच कठीण असतं असं त्या सांगतात. तरुण असतानाच आपण गे आहोत याची जाणीव त्यांना झाली. पण कुटुंब, मित्र आपली खिल्ली उडवतील, आपल्यावर हसतील ही भीती त्यांना सतत वाटायची.
पण आता जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती मिळाली, तेव्हा काही विरोध न करता त्यांनी पाठिंबा दिल्याचं कलावती मिस्त्री सांगतात. आपल्या कुटुंब आणि मित्रांनी मोठ्या थाटामाटात मिरिअम जेफरसनचं स्वागत केलं सांगताना त्यांच्या चेह-यावरील आनंद ओसांडून वाहत होता. माझ्या या निर्णयामुळे अनेक गे लोकांना आपला धर्म, जातीची भिंत ओलांडून नातं स्विकारण्याची हिंमत मिळेल अशी अपेक्षा कलावती मिस्त्री यांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक हिंदू पंडितानेच त्यांचं लग्न लावून दिलं. आपल्याला या लग्नाचा सहभागी होण्याची संधी मिळाली यामुळे आनंदित आहे असं चंदा व्यास यांनी सांगितलं आहे. इंग्लंडमधील एका रेस्टॉरंटमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी हिंदू पद्धतीने लग्न झालं असलं, तरी याआधीच त्यांनी गतवर्षी ज्यू पद्धतीने टेक्सास येथे लग्न केलं होतं. 'हिंदू पद्धतीने लग्न केल्याचा खूप आनंद आहे. यामुळे आता आम्ही पुर्ण झालो आहोत', अशी प्रतिक्रिया मिरिअम जेफरसन यांनी दिली आहे. थोड्या दिवसात ते पुन्हा अमेरिकेला परतणार आहेत.