कराची- मुस्लिमबहुल पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात थारमध्ये वास्तव्याला असणारी हिंदू-दलित महिला कृष्णा कुमारी कोलहीला लोकांनी सिनेटर म्हणून निवडून दिलं आहे. बिलावल भुट्टो जरदारी यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी(पीपीपी)कडून 39 वर्षांची कृष्णा कुमारी कोलही निवडून आली आहे.डॉनच्या वृत्तानुसार, कृष्णा सिंध प्रांतातल्या महिलांसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघातून निवडून आली आहे. कृष्णानं निवडणुकीत तालिबानशी संबंधित असलेल्या एका मौलानाचा पराभव केला आहे. कृष्णाची सिनेटर म्हणून निवड झाल्यामुळे पाकिस्तानातल्या अल्पसंख्याकांचे अधिकार आणि महिलांसाठी ती एक मैलाचा दगड ठरणार आहे. कोलही सिंध प्रांतातील थारमधल्या सुदूर नगरपारकर जिल्ह्यातील रहिवासी आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या कृष्णाचे वडील शेतकरी आहेत.1979मध्ये जन्मलेल्या कृष्णाचं 16व्या वर्षीच लग्न झालं. त्यावेळी कृष्णा 9व्या इयत्तेत शिकत होती. लग्नानंतरही कृष्णानं शिक्षण घेणं सुरूच ठेवलं. 2013साली कृष्णानं सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात मास्टर्सची पदवी संपादन केली. त्यानंतर कृष्णा स्वतःच्या भावाबरोबरच पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये कार्यकर्ती म्हणून सहभागी झाली. कोलहीनं अल्पसंख्याकांच्या अधिकारासाठी आवाज उठवला. कृष्णा स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवाराशी निगडित आहे. या निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पार्टीनं 15 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच संसदेत ती सर्वात मोठी पार्टी म्हणून समोर आली आहे.
हिंदू महिलेनं पाकिस्तानमध्ये घडवला इतिहास, पाकिस्तानच्या राजकारणात असे कधीच झाले नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2018 4:34 PM