पाकिस्तान एअर फोर्समध्ये हिंदू युवक बनला पायलट, इतिहासात पहिल्यांदाच संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:24 AM2020-05-04T11:24:35+5:302020-05-04T11:27:24+5:30
पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, राहुल देव हे थारपारकर येथील रहिवाशी आहेत.
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तान एअर फोर्समध्ये एक हिंदू पायलट दाखल झाला आहे. राहुल देव असे या भरती झालेल्या तरुणाचे नाव असून पाकिस्तान एअर फोर्समध्ये जनरल ड्युटी पालयट ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या अत्याचारामुळे बदनाम असलेल्या पाकिस्तानमध्ये अप्लसंख्याक हिंदू युवकास एवढ्या मोठ्या पदावर रुजू करुन घेणे, ही सुखद घटना मानण्यात येते.
पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, राहुल देव हे थारपारकर येथील रहिवाशी आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून थारपारकरची ओळख आहे. या जिल्ह्यात हिंदू रहिवाशांची संख्या लक्षणीय असून राहुल देवची पायलट म्हणून भरती होताच, येथील हिंदूंनी आनंद व्यक्त केला. ऑल पाकिस्तान हिंदू पंचायत सेक्रेटरी रवि दवानी यांनी राहुल देवच्या पायलटपदी नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच, राहुलचे अभिनंदनही केले.
दवानी यांनी म्हटले की, अल्पसंख्यांक समुदायाचे लोक सिव्हील सर्व्हिस आणि पाकिस्तानी आर्मीमध्ये सेवा देत आहेत. केवळ एवढेच नाही, पाकिस्तानमध्ये अनेक डॉक्टर हिंदू आहेत. पाकिस्तान सरकारने अल्पसंख्यांक समुदायावर आपलं लक्ष केंद्रीत केल्यास, पुढील काळात राहुल देव आपल्या देशाच्या सेवेसाठी तय्यार असतील. दरम्यान, राहुलच्या या नियुक्तीनंतर देव कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
आणखी वाचा
गरीब मजूरांकडून तिकीटाचे पैसे घेऊ नका, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारला विनंती
... तर लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरु, खासदार जलील यांचा इशारा