न्यूयॉर्क: अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी होऊ नये, यासाठी सगळ्यांनीच सतर्क राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत केलं. अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ द्यायचा नसेल, तर आपण सजग राहायला हवं. जे दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांनादेखील दहशतवादाचा फटका बसू शकतो, ही बाब त्यांनी लक्षात ठेवावी, अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला.
अफगाणिस्तान, दहशतवाद, कोरोना संकट, लसीकरण, हवामान बदल अशा विविध मुद्द्यांवर मोदींनी संयुक्त राष्ट्राला संबोधित केलं. जगात सध्या अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. छुपी युद्धं सुरू आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती वाईट आहे. तिथल्या जनतेला, महिलांना, लहान मुलांना, अल्पसंख्याकांना मदतीची गरज आहे. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, असं मोदी म्हणाले.
जगासमोर कट्टरतावादाचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रगतीशील विचार वाढायला हवेत. समुद्र हा आपल्याकडे असणारा मोठा नैसर्गिक ठेवा आहे. त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आपण समुद्रातील संसाधनांचा वापर करायला हवा, गैरवापर करू नये. आंतरराष्ट्रीय व्यापारात समुद्र आपल्यासाठी लाईफलाईन आहेत. त्यामुळे आपण समुद्रांना विस्तारवादाच्या स्पर्धेपासून दूर ठेवायला हवं, असं मत मोदींनी व्यक्त केलं.