रशियन अंतराळवीराने रचला इतिहास; सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा केला विश्वविक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 08:07 PM2024-02-04T20:07:29+5:302024-02-04T20:09:12+5:30
यापूर्वी हा विक्रम आणखी एका रशियन अंतराळवीराच्याच नावावर होता.
Russia News: जगातील पहिले अंतराळ मिशन करण्याचा विक्रम रशियाने केला आहे. रशियाचे अंतराळ तंत्रज्ञानदेखील अतिशय प्रगत आणि आधुनिक आहे. अशातच आता रशियाच्या नावे आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को (Oleg Kononenko) यांनी रविवारी(दि.4) सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्यांनी आपल्याच देशातील अंतराळवीर गेनाडी पडल्का यांचा विक्रम मोडला आहे.
59 वर्षीय ओलेग कोनोनेन्को यांनी आपल्याच देशाच्या अंतराळवीर गेनाडी पडालका यांचा विक्रम मोडून ही कामगिरी केली आहे. Gennady Padalka यांनी अंतराळात 878 दिवसांपेक्षा जास्त दिवस घालवले होता. तर, आता कोनोनेन्को यांनी हा विक्रम मोडला आहे असून, ते 5 जून 2024 पर्यंत अंतराळात राहण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत ते अंतराळात एक हजार दिवस पूर्ण करतील. अशाप्रकारची कामगिरी यापुर्वी कोणत्याही अंतराळवीराने केलेली नाही.
5 जूनपर्यंत अंतराळात राहणार
कोनोनेन्को यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) मधून दिलेल्या मुलाखतीत मीडियाला म्हटले की, 'मला जे काम आवडते, ते करण्यासाठी मी अंतराळात उड्डाण करतो, विक्रम प्रस्थापित करण्यासाठी नाही. मला माझ्या कामगिरीचा अभिमान आहे, परंतु अधिक अभिमान याचा की, अंतराळात सर्वाधिक काळ राहणारे दुसरे व्यक्ती रशियनच आहेत.' दरम्यान, कोनोनेन्को सध्या पृथ्वीपासून सुमारे 263 मैल (423 किमी) अंतरावर फिरत आहे.