लंडन- दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये विविध छळछावण्यांमध्ये जर्मन नाझीसैनिकांचे अत्याचार सहन करणाऱ्या जेना तुर्गेल यांचे निधन झाले आहे. त्या 95 वर्षांच्या होत्या. बंदीवासात असताना त्यांनी अॅन फ्रँकची काळजी घेतली होती. अॅन फ्रँकच्या डायरीवर आधारीत डायरी ऑफ अॅन फ्रँक पुस्तक जगभरात विविध भाषांमध्ये प्रसिद्ध झाले असून आजही ते वाचले जाते.जेना तुर्गेल ब्राइड ऑफ बेल्सन नावानेगही ओळखल्या जायच्या.
तुर्गेल यांचा जन्म 1923 साली पोलंडमधील क्राकोव येथे झाला. नऊ भावंडांमध्ये त्या सर्वात लहान होत्या. त्या 16 वर्षे वयाच्या होत्या तेव्हा म्हणजे सप्टेंबर 1939मध्ये नाझी फौजांनी पोलंडवर आक्रमण करुन पोलंड ताब्यात घेतले. त्याचवेळेस दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली. चार भावंडे आणि आईसह जेना यांना जवळच्या घेटोमध्ये स्थलांतरित व्हावे लागले. त्यावेळेस त्यांच्याजवळ थोडेसे पीठ आणि काही बटाटे एवढेच साहित्य होते. हिटलरच्या सैन्याने त्यांच्या एका भावाला ठार मारले, दुसरा युद्धात नाहीसा झाला तो परत कधीच दिसला नाही. तर एका बहिणीस व तिच्या यजमानास प्लास्झोव येथील श्रमछावणीत अन्न चोरताना ठार मारण्यात आले. त्यानंतर 1944मध्ये तुर्गेल व त्यांच्या आई, बहिणी यांनाही प्लास्झोव छावणीत पाठविण्यात आले. बहिणी व आईला नंतर ऑशविट्झ छळछावणीत मृत्यूच्या वाटेवर पाठविण्यात आले, त्या नंतर कधीच कोणाला दिसल्या नाहीत.
जानेवारी 1945मध्ये त्यांनी बेर्जेन बेल्सन येथे रुग्णालयात नर्सचे काम केले. त्यावेळेस त्यांच्यासमोर उपचारासाठी अॅन फ्रँक आली होती. ती प्रथम रुग्णालयात उपचारासाठी आली तेव्हा ती अत्यंत घाबरलेली होती असे तुर्गेल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर मी तिचा चेहरा स्वच्छ केला, तिला प्यायला पाणी दिले. असेही त्यांनी सांगितले. बर्गेन बेल्सन हा परिसर 1945 साली ब्रिटिशांनी नाझींच्या तावडीतून मुक्त केला. त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नॉर्मन तुर्गेल यांच्याशी जेना यांनी विवाह केला. त्यांचा विवाहाचा पोशाख ब्रिटिश लष्कराच्या पॅराशूटने बनविण्यात आला होता. हा पोशाख आता लंडनमधील इम्पेरियल वॉर म्युझियम येथे ठेवण्यात आला आहे. 1987 साली तुर्गेल यांनी आय लाइट अ कॅन्डल हे स्वतःच्या अनुभवांवर आधारित पुस्तक लिहिले.