बगदाद : इराकची राजधानी बगदादमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलिंडर फुटल्यामुळे लागलेल्या आगीत ८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ११० जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. इब्न अल- खातिब हॉस्पिटलमधून रुग्णांना बाहेर काढले. या हॉस्पिटलमध्ये आयसीयूत कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार केले जात होते.
डॉ. सबा अल-कुजै यांनी सांगितले की, किती लोक मृत्युमुखी पडले आहेत ते मी सांगू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये अनेक ठिकाणी जळालेले मृतदेह आहेत. इराकच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने सांगितले की, ८२ लोकांचा मृत्यू झाला असून ११० जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान मुस्तफा अल कादिमी यांनी बगदादच्या आरोग्य विभागात अल-रुसफा भागासाठी नियुक्त महासंचालकांना हटविले आहे. याच भागात हे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या संचालकांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. इराकमधील संयुक्त राष्ट्रांचे दूत जेनिन हेनिस प्लेसकार्ट यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. असे सांगितले जात आहे की, हॉस्पिटलमधील एक ऑक्सिजन सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागली.
आपत्कालीन बैठक
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आगीच्या घटनेनंतर पंतप्रधानांनी आपत्कालीन बैठक बोलविली. यावेळी पंतप्रधानांनी सांगितले की, ही घटना बेजबाबदारपणामुळे घडली आहे. ही चूक नसून गुन्हा आहे. या प्रकरणाचा अहवाल २४ तासांच्या आत देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.