दुबई- विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करणारी किंवा स्पेशलाइज्ड रुग्णालये आपण पाहिली असतील किंवा त्यांची माहिती आपल्याला असेल मात्र आता दुबईमध्ये एक वेगळेच रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. हे आहे टेडी बियरचे रुग्णालय, लहान मुलांना आपल्या "आजारी" टेडी बियरला येथे नेऊन त्यावर "उपचार " करता येणार आहेत. डॉक्टरांकडून उपचार घेताना मुलांची होणार अस्वस्थता कमी करण्यासाठी हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे.
उद्घाटनाच्यावेळेस एका टेडी बियरचे सीटी स्कॅन करण्यात आले त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी भूलविभागात त्याला पाठविण्यात आले. हे रुग्णालय मोहम्मद बिन रशिद युनिवर्सिटी ऑफ मेडिसिन अँड हेल्थ सायन्सेस येथए सुरु करण्यात आले आहे. डॉक्टरांना भेटताना, त्यांच्याकडून उपचार घेताना लहान मुलांमध्ये निर्माण होणारी भीती, अस्वस्थता टाळण्यासाठी हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान तसेच दुबईचे शासक मोहम्मद बिन रशिद अल मख्तुम आणि चार लहान मुले उपस्थित राहिले होते. या मुलांच्या टेडी बियरना रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी टेडी बियरच्या आरोग्यावर मुलांशी "चर्चा" केली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार होईपर्यंत ही मुले तेथेच थांबली. टेडी बियरचे वैद्यकीय अहवाल आल्यावर या मुलांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि मग मुलांकडे टेडीचे वैद्यकीय अहवाल आणि सीटीस्कॅनचा अहवाल देण्यात आला.