अंतराळात हॉटेल, दिवसाचे भाडे फक्त ५ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:05 AM2018-04-10T04:05:55+5:302018-04-10T04:05:55+5:30
सुट्ट्यांमध्ये मौजमजा करण्याच्या प्रत्येकाच्या अनोख्या कल्पना असतात. अशांना चार वर्षांनंतर चक्क अंतराळातील पहिल्यावहिल्या हॉटेलमध्ये ‘सुट्टीचा काळ मजेचा' घालविता येणार आहे.
सुट्ट्यांमध्ये मौजमजा करण्याच्या प्रत्येकाच्या अनोख्या कल्पना असतात. अशांना चार वर्षांनंतर चक्क अंतराळातील पहिल्यावहिल्या हॉटेलमध्ये ‘सुट्टीचा काळ मजेचा' घालविता येणार आहे. या लक्झरी हॉटेलचे नाव आहे ‘आॅरोरा स्टेशन’ असून ते अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीतील ओरायन स्पॅन या कंपनीतर्फे सुरू केले जाईल. अंतराळातील हॉटेलची संकल्पना आहे फारच रम्य पण त्याचे दर भरमसाठ आहेत. जगातील सर्वात महागडी हॉटेल रूम जिनिव्हातील हॉटेल प्रेसिडेंट विल्सनमध्ये आहे. इथे एक रात्र राहायचे असेल तर ८० हजार डॉलर म्हणजे ५३ लाख रुपये मोजावे लागतात. आॅरोरा स्टेशन या अंतराळातील हॉटेलची तर सारी बातच न्यारी आहे. हे हॉटेल पृथ्वीपासून अंतराळात २०० मैैल उंचीवर असणार आहे. त्यातील एका रूमच्या नुसत्या बुकिंगसाठी ८० हजार डॉलर मोजावे लागतील. आॅरोरा स्टेशन हॉटेलमध्ये एखाद्या व्यक्तीला १२ दिवस राहायचे असेल, तर मोजावे लागतील ९.५ दशलक्ष डॉलर म्हणजे ६१.६ कोटी रुपये. त्यामुळे सध्या तरी गर्भश्रीमंतांच्याच आवाक्यातले हे प्रकरण आहे. 'सेव्हन डेज सेवन नाइट्स'च्या टूरचा बेत आखून पर्यटनाला निघणाऱ्या मध्यमवर्गीय माणसासाठी आॅरोरा स्टेशनमध्ये राहाणे हे या घडीला तरी स्वप्नवतच आहे.