अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडिअममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. सोशल मिडीयावरही नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमस्थळी जवळपास 50 हजारांच्या आसपास नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात करताना, अमेरिकेचे खासदार आणि काँग्रेस नेते स्टेनी हॉयर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. यावेळी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधावर भाष्य केले. तसेच, दोन्ही देशातील समानतेवरही चर्चा केली.हायर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मोदींसमोर महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरुंचे कौतुक केलं. या दोन दिग्गज नेत्यांच्या विचारांवरच दोन्ही देशांची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. हायर यांनी दोन्ही उभय देशांमधील मूल्यांची चर्चा केली, उत्तम भविष्याबद्दलही आशावाद व्यक्त केला. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, विज्ञान, परमाणू क्षेत्र, सॉफ्टवेअर व इतर क्षेत्रांमध्ये सौदार्हपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, नेहरू आणि गांधी यांची शिकवण आजही महत्त्वपूर्ण असून दोन्ही देश त्यांच्याच विचारांवर चालतात, असेही हायर यांनी म्हटले.
अमेरिकेसह भारतही महात्मा गांधी यांच्या शिकवणीतून भविष्य घडविण्याच्या परंपरेचा अभिमान बाळगतो. जवाहरलाल नेहरूंच्या दृष्टीकोनातील धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही परंपरेचा आपण सन्मान करतो. तसेच, दोन्ही देश मानवाधिकाराचेही पालन करत असल्याचे हायर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील म्हटले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर होते. दरम्यान, नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून नेहमीच पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात. त्यामुळे नेहरुंचे गुणगाण गाऊन सुरू झालेल्या या कार्यक्रमानंतर सोशल मीडियात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच, काही नेटीझन्सकडून मोदींना लक्ष्यही केलं जात आहे. दरम्यान, हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसने नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमावेळी नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्याची स्तुती केली होती. तसेच ''अबकी बार ट्रम्प सरकार'' असे म्हणत मोदी यांनी येत्या अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले होते.