प्रश्न- मी मुंबईत राहणारा अमेरिकन नागरिक आहे. मी आत्ताच वयाची १८ वर्षे पूर्ण केली असल्यानं याआधी कधीही मतदान केलेलं नाही. माझे पालकदेखील मुंबईत राहतात. ते आधी मिशिगनला वास्तव्यास होते. मी अमेरिकेत मतदान करू शकतो का? त्यासाठी मी कोणत्या राज्यात नोंदणी करावी? मी अॅबसेन्टी बॅलटसाठी कसा अर्ज करू शकतो?उत्तर: मतदान करणं ही अमेरिकन नागरिकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. यासाठी पहिल्यांदा तुम्ही मतदानासाठी पात्र आहात का, ते तपासायला हवं. तुम्ही १८ किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे अमेरिकन नागरिक असल्यास, तुमचा जन्म परदेशात झाला असल्यास, तुम्ही कधीही अमेरिकेत वास्तव्य केलं नसल्यास, तुम्हाला अमेरिकेतल्या प्राथमिक आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करता येतं. तुम्ही अॅबसेन्टी म्हणून मतदान करण्यासाठी पात्र आहात का, याची ऑनलाईन पडताळणी फेडरल व्होटिंग असिस्टंट प्रोग्रामवर जाऊन करता येईल. तुमचे पालक कोणत्या राज्यात वास्तव्यास होते, याची माहिती तुम्हाला असायला हवी. तुमच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास, तुमचे पालक मिशिगनमध्ये राहत होते. त्यामुळे तुम्हाला मिशिगनमध्ये मतदान करता येईल. मात्र त्यासाठी तुम्ही इतर कोणत्याही राज्यात नोंदणी केलेली नसावी. जर तुम्ही मतदान करण्यासाठी पात्र असाल, तर तुम्हाला स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेडरल पोस्ट कार्ड अॅप्लिकेशन (एफपीसीए) जमा करावं लागतं. यामुळे तुम्ही मतदान नोंदणी आणि अॅबसेन्टी बॅलेटसाठी एकाचवेळी अर्ज करता. तुम्ही एफपीसीए पोस्टानं पाठवू शकता. अनेक राज्यं तुम्हाला एफपीसीए फॅक्स किंवा ई-मेलद्वारे पाठवण्याचीही मुभा देतात.तुम्ही मतदानाच्या किमान ९० दिवस आधी एफपीसीए पाठवायला हवं. एफपीसीए ४५ दिवस आधी पाठवल्यासही त्या विनंतीवर प्रक्रिया करता येते. परदेशात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकानं अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी दरवर्षी नवीन एफपीसीए जमा करायला हवा. तुम्ही नाव, ईमेल किंवा पत्ता बदलल्यावर याबद्दलची माहिती दर जानेवारी महिन्यात एफपीसीएच्या माध्यमातून द्या. एफपीसीएमधून स्थानिक निवडणूक अधिकारी तुम्ही मतदानासाठी पात्र आहात की नाहीत, हे तपासून पाहतात. यानंतर तुम्हाला एक रिक्त अॅबसेन्टी बॅलट इलेक्ट्रॉनिकली किंवा मेलच्या माध्यमातून पाठवण्यात येतो. प्राथमिक, विशेष निवडणुकीच्या ३० दिवस आधी बॅलट पाठवण्यात येतो. जर तुम्ही बॅलट ईमेलच्या माध्यमातून पाठवण्याची विनंती केली असेल, तर तो योग्य वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही बॅलट पत्राच्या माध्यमातून मागवलं असल्यास त्यासाठी पोस्टल डिलेव्हरी सिस्टीमला आवश्यक असणारा वेळ लागेल. अॅबसेन्टी बॅलट मिळाल्यावर तो भरा आणि दिलेल्या मुदतीत परत पाठवा. ही मुदत तुम्ही ऑनलाईन तपासू शकता. बॅलेट तुमच्याकडे किती वेळात पोहोचेल, याचा विचार करुन मेल सेवा निवडा. बॅलट डेडलाईनच्या आधी येईल याची काळजी घ्या. तुम्ही संपूर्ण भरलेला बॅलेट स्थानिक पोस्टल सेवेच्या माध्यमातून इंटरनॅशनल पोस्टेजच्या मदतीनं एक्स्प्रेस कुरियर सेवेच्या माध्यमातून पाठवू शकता किंवा जवळ असलेल्या अमेरिकेच्या दुतावासात जमा करू शकता. काही राज्यं भरलेला बॅलट इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशनच्या माध्यमातून जमा करण्याचीदेखील मुभा देतात. निवडणुकीच्या ३० दिवस आधी तुम्हाला बॅलट मिळाला नसल्यास तुम्ही राईट-इन अॅबसेन्टी बॅलटचा (एफडब्ल्यूएबी) वापर पर्याय म्हणून करू शकता. फेडरल ऑफिससाठी मतदान करताना तुमच्याकडे हा पर्याय उपलब्ध असतो. यासाठीची अधिक माहिती फेडरल व्होटिंग असिस्टन्स प्रोग्रामवर पाहू शकता. निवडणुकीच्या दिवशी अमेरिकन दूतावास किंवा वकिलात बॅलटसाठी नोंदणी अर्ज स्वीकारत नाही आणि बॅलट पुरवतही नाही. राज्यांनी पाठवलेले बॅलट दूतावासात आधीच जमा केल्यास ते स्वीकारले जातात. अमेरिकेतल्या निवडणुकांचं व्यवस्थापन राज्यस्तरावर होतं. त्यामुळे तुम्ही अमेरिकन नागरिक असल्यास, तुम्ही तुमची नोंदणी राज्याकडे करायला हवी आणि मतदानासाठी आधीच बॅलटसाठी विनंती करायला हवी.
मुंबईत राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना निवडणुकीत कसं मतदान करता येईल?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 9:48 PM