अमेरिकेच्या दूतावासाकडे व्हिसासाठी अर्ज करताना ऍप्लिकेशन फॉर्म कसा अपडेट करावा?
By कुणाल गवाणकर | Published: November 7, 2020 10:00 AM2020-11-07T10:00:00+5:302020-11-07T10:00:02+5:30
अमेरिकेत प्रवास करण्याचा हेतू लक्षात घेऊन तुम्ही कोणत्या व्हिसासाठी अर्ज करायचा हे निश्चित करा.
प्रश्न: मी मुंबईतल्या अमेरिकेच्या दूतावासाकडे व्हिसासाठी अर्ज करतोय. मी माझा ऍप्लिकेशन फॉर्म (डीएस-१६० किंवा डीएस-२६०) कसा अपडेट करावा?
उत्तर: व्हिसासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांनी नॉनइमिग्रंट व्हिसासाठी डीएस-१६० आणि इमिग्रंट व्हिसासाठी डीएस-२६० अर्ज भरणं गरजेचं आहे. अमेरिकेत प्रवास करण्याचा हेतू लक्षात घेऊन तुम्ही कोणत्या व्हिसासाठी अर्ज करायचा हे निश्चित करा. त्यानंतर http://ceac.state.gov/ceac वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरता येईल.
प्रत्येक अर्जासोबत एक अल्फा-न्युमरिक बारकोड तयार होतो. अर्ज जमा केल्यानंतर त्यातील बायोग्राफिकल माहिती बदलता येत नाही. त्यामुळे अर्ज जमा करण्याआधी त्यातील माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एखादी चूक लक्षात आल्यास तुम्ही नवा ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्यानंतर पुन्हा नवा बारकोड नंबर तयार होईल. बऱ्याचशा प्रकरणांमध्ये तुम्हाला व्हिसा शुल्क पुन्हा भरावं लागत नाही. याशिवाय तुम्ही आधी घेतलेल्या अपॉईंटमेंटची तारीखदेखील कायम ठेवू शकता. दूतावासात येताना सर्वात अपडेटेड कन्मफर्मेशन पेज आणि तुमच्या अपॉईंटमेंटचा बारकोड घेऊन घ्या.
डीएस-१६० आणि डीएस-२६० अर्ज पूर्ण आणि अचूक भरलेला हवा. अर्धवट अर्ज भरला असल्यास तुम्ही चुकीची माहिती देत असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. त्यामुळे अमेरिकन व्हिसासाठी तुम्ही कायमचे अपात्र ठरू शकता. डीएस-१६० किंवा डीएस-२६० अर्ज ऑनलाईन जमा करण्याआधी त्यात पूर्ण आणि अचूक माहिती भरल्याची खात्री करून घ्या. बायोमेट्रिक्स आणि मुलाखतीच्या अपॉईंटमेंटवेळी डीएस-१६० किंवा डीएस-२६० अर्जाचं अपडेटेड कन्फर्मेशन पेज आणण्यास विसरू नका.