प्रश्न - स्टुडंट व्हिसासाठी केव्हा अर्ज करायचा आणि अमेरिकेत कधी प्रवेश करायचा, हे कसे कळू शकेल?
उत्तर - स्टुडंट F-1 व्हिसासाठी अर्ज करणं ही अनेक टप्प्यांत होणारी प्रक्रिया आहे. सर्वात आधी अर्जदारानं स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिझिटर प्रोग्राम (एसईव्हीपी) अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यावा. एसईव्हीपीच्या अंतर्गत येणाऱ्या अमेरिकेतल्या 4,500 संस्थांची यादी https://studyinthestates.dhs.gov/school-search या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट 'एज्युकेशनयूएसए'च्या माध्यमातून अमेरिकेत शिकू इच्छिणाऱ्यांना मोफत सल्ला देतं. मुंबई,अहमदाबाद आणि देशातील इतर शहरांमध्ये एज्युकेशनयूएसएची कार्यालयं आहेत. या कार्यालयांमध्ये अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी https://educationusa.state.gov/ या संकेतस्थळाला भेट द्या.
प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी अर्जदारांनी त्यांच्या विद्यापीठानं फॉर्म आय-20, नॉन इमिग्रंट स्टुडंट स्टेटस मिळवण्यासाठी ठरवून दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी. आय-20 मध्ये विद्यार्थी, त्याच्या अभ्यासक्रमाचं क्षेत्र, त्यासाठीचा खर्च आणि त्याचा कालावधी यांची माहिती असते. याशिवाय अभ्यासक्रम कधी सुरू होणार याचीही तारीख असते.
आय-20 फॉर्म मिळाल्यानंतर विद्यार्थी http://ceac.state.gov संकेतस्थळावर जाऊन व्हिसासाठी आवश्यक अर्ज भरू शकतात. यानंतर विद्यार्थ्यांनी व्हिसा अर्जासाठी आवश्यक शुल्क भरावं आणि दोन अपॉईंटमेंट निश्चित कराव्यात. यातील एक बायोमेट्रिक कलेक्शनसाठी, तर दुसरी व्हिसाच्या मुलाखतीसाठी असेल. ज्या प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करत आहात, तो आय-20 अर्जावरील व्हिसा प्रकाराशी जुळत असल्याची खात्री विद्यार्थ्यांनी करून घ्यावी. विद्यार्थी त्यांच्या आय-20 अर्जावर नमूद करण्यात आलेल्या तारखेच्या (शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख) 120 दिवस आधी व्हिसा मुलाखतीची तारीख निश्चित करू शकतात.
व्हिसा मुलाखतीच्या दोन दिवस आधी विद्यार्थ्यांनी स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिसा इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या (SEVIS) https://fmjfee.com/ संकेतस्थळावर जाऊन SEVIS शुल्क भरावं. एका व्हिसा अर्जदारासाठी 200 डॉलर इतकं SEVIS शुल्क आकारलं जातं. डिपार्टमेंट ऑफ स्टेटकडून आकारण्यात येणाऱ्या नॉन-रिफंडेबल ऍप्लिकेशन फी व्यतिरिक्त हे शुल्क आकारण्यात येतं. विद्यार्थ्यांनी SEVIS शुल्क भरल्यानंतर मिळणाऱ्या पावतीची प्रत व्हिसा मुलाखतीवेळी घेऊन यावी.
व्हिसा मुलाखतीवेळी अर्जदारानं स्वाक्षरी करण्यात आलेला मूळ आय-20 अर्ज, SEVIS पावती आणि वैध पासपोर्ट दाखवावा. व्हिसा मंजूर झाल्यावर दूतावासाकडून अर्जदाराला त्याचा पासपोर्ट 3 ते 5 दिवसांत परत केला जातो. विद्यार्थी त्यांच्या स्टुडंट व्हिसाचा वापर करून आय-20 फॉर्मवर नमूद करण्यात आलेल्या तारखेच्या (अभ्यासक्रम सुरू होण्याच्या) 30 दिवस आधी अमेरिकेत येऊ शकतात. अमेरिकेत येताना तुमच्यासोबत ओरिजिनल आय-20 फॉर्म घेऊन येणं गरजेचं आहे. तुम्ही अमेरिकेत आल्यावर यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन अधिकारी हा फॉर्म तपासतात.