प्रश्न- माझ्या मुलीला अमेरिकेत शिक्षण घ्यायचं आहे. तिला स्टुडंट व्हिसा कसा मिळू शकेल?उत्तर: स्टुडंट व्हिसा मिळवण्यासाठी प्रथम तुमच्या मुलीला अमेरिकेतील शाळेत प्रवेश मिळायला हवा. अमेरिकेतील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाल्यावर तुमच्या मुलीला आय-२० अर्ज मिळेल. याशिवाय तिला SEVIS शुल्क भरण्याच्या सूचनाही दिल्या जातील. आय-२० अर्ज मिळाल्यानंतर तुमची मुलगी व्हिसा मिळवण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरु करु शकते. यासाठी तिला www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. याठिकाणी तिला अर्ज करुन व्हिसासाठीच्या मुलाखतीसाठी आणि बायोमेट्रिकसाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागेल.अमेरिकेत ४,५०० हून अधिक शैक्षणिक संस्था आहेत. याठिकाणी परदेशातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तुमच्या कुटुंबानं शैक्षणिक संधींचा शोध सुरु केल्यास, तुम्हाला एज्युकेशन यूएसए (www.educationusa.state.gov) या संकेतस्थळावरुन तिथली शैक्षणिक व्यवस्था आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळेल. अमेरिकेतील शिक्षण संस्थांबद्दलची योग्य आणि अचूक स्वरुपाची प्राथमिक माहिती याठिकाणी मिळू शकेल. मुंबईतील अमेरिकेचे काऊन्सिलेट जनरल आणि एज्युकेशन यूएसए यांच्याकडून विद्यार्थी आणि पालकांसाठी विविध सत्रांचं आयोजन केलं जातं. कॉन्सलेटच्या दोस्ती हाऊस आणि देशभरातील शैक्षणिक मेळाव्यांमध्ये अशा प्रकारची सत्रं आयोजित केली जातात. याबद्दलचं वेळापत्रक आणि नोंदणीबद्दलची माहिती एज्युकेशन यूएसए या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्टुडंट व्हिसा डे म्हणजेच ६ जून २०१८ रोजी तुमच्या मुलीला व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अपॉईंटमेंट घेता येईल. 'स्टुडंट व्हिसा डे'चं आयोजन वर्षातून एकदा केलं जातं. यावेळी भारतातले आमचे सर्व अधिकारी व्हिसासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतात. यावेळी विद्यार्थ्यांना एकमेकांची भेट घेता येते. त्यांना अमेरिकेतील शिक्षणाच्या संधींची माहिती मिळते. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागीदेखील होता येतं. त्यामुळे तुमची अपॉईंटमेंट आजच नक्की करा.
कसा मिळवाल अमेरिकेचा स्टुडंट व्हिसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 12:50 PM