Howdy Modi : मोदींना पाहावी लागली तासभर वाट, ट्रम्प यांच्या उशिरा येण्यामागे हे होतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 08:23 AM2019-09-23T08:23:16+5:302019-09-23T08:23:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये झालेल्या आयोजित हाऊडी मोदी कार्यक्रमात 50 हजार लोकांना संबोधित केलं आहे.
ह्युस्टनः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये झालेल्या आयोजित हाऊडी मोदी कार्यक्रमात 50 हजार लोकांना संबोधित केलं आहे. एनआरजी स्टेडियम खचाखच भरलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांना मोदींनी आपल्या भाषणानं मंत्रमुग्ध केलं. तसेच भारताच्या प्रगतीचा आलेख दाखवला. परंतु या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एक तासांहून अधिक विलंबानं पोहोचले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फार काळ वाट पाहावी लागली.
ह्युस्टनमध्ये एनआरजी स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण रात्री 9.20 वाजताच्या दरम्या सुरू झालं. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संबोधित करणार होते. परंतु ते Howdy Modi कार्यक्रमात रात्री 10.25 वाजता पोहोचले. म्हणजे ते एक तास पाच मिनिटं उशिरानं कार्यक्रमात दाखल झाले. ह्युस्टनमध्ये आलेल्या पुराचा आढावा घेण्यासाठी ट्रम्प यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. त्यानंतर ते हाऊडी मोदी कार्यक्रमात दाखल झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ह्युस्टनमधल्या पूरग्रस्त भागात 5 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 'Howdy Modi' कार्यक्रमाला येण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटसुद्धा केलं होतं. ह्युस्टनमध्ये मी माझ्या मित्रासोबत असेन, 'Howdy Modi' या कार्यक्रमामुळे दिवस शानदार राहणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते.
ह्युस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर भाषणाला मोदींनी हिंदीतून सुरूवात करतानाच तेथील जनसमुदाय, उत्साह, जल्लोष याचा उल्लेख केला. हे दृश्य, हा माहोल अकल्पनीय आहे. टेक्सासच्या इतिहासात हे अविश्वसनीय आहे. हा अपार जनसमूह उपस्थित आहे. ही संख्या गणितात मोजता येणारी नाही. नवा इतिहास घडतो आहे. ट्रम्प यांचे येणे हे अमेरिकेच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेत भारताच्या सामर्थ्याचा डंका आहे. १३० कोटी भारतीयांचा हा सन्मान आहे. लोकप्रतिनिधी व अनेक जण येथे आलेले आहेत. सर्वांचे स्वागत व अभिनंदन. येथे येण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी नोंदणी केली होती. हजारोंना येथे येता आले नाही. त्यांची मी माफी मागतो.
- अब की बार ट्रम्प सरकार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरजी स्टेडियममध्ये ट्रम्प यांना भाषणासाठी आमंत्रित केले. यावेळी त्यांनी अब की बार ट्रम्प सरकार हा नाराही दिला. मोदी म्हणाले की, ट्रम्प यांचा कोणताही परिचय करून देण्याची गरज नाही. मी त्यांचे नेतृत्व, अमेरिकेबाबतची त्यांची प्रबळ इच्छा व अमेरिकेची वाटणारी त्यांना चिंता याबाबत मी त्यांची प्रशंसा करतो. मी जेव्हा त्यांना प्रथम भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले होते की, भारताचा सच्चा मित्र व्हाईट हाऊस आहे. न्यू जर्सी ते न्यू दिल्ली, ह्युस्टनपासून हैदराबादपर्यंत, बोस्टनपासून बेंगळुरूपर्यंत, शिकागोपासून शिमलापर्यंत आणि लॉस एंजिल्सपासून लुधियानापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध मानवीय आहेत, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.