कार सोडा, पाकिस्तानी रॉकेलचा दिवा लावतानाही शंभरदा विचार करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 07:34 PM2019-04-30T19:34:01+5:302019-04-30T19:35:29+5:30
डिझेलची किंमत वाढल्यास दैनंदिन वापरातील वस्तूंची किंमतही वाढणार आहे.
दिवाळखोरीकडे निघालेला पाकिस्तान आता महागाईच्या झळांमध्ये होरपळू लागला आहे. यामुळे येत्या काळात पाकिस्तानामध्येपेट्रोल, डिझेलसह रॉकेलच्याही दरांचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. पेट्रोलियम प्राधिकरणाने डिझेलह अन्य इंधनांची 15 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
डिझेलची किंमत वाढल्यास दैनंदिन वापरातील वस्तूंची किंमतही वाढणार आहे. तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किंमतीही वाढणार आहेत. यामुळे पाकिस्तान आधीच दिवाळखोरीकडे जात असताना महागाईमुळे नागरिकांचे कंबरडेच मोडले जाणार आहे.
पेट्रोलचे दर वाढणार
पाकिस्तानच्या तेल आणि गॅस प्राधिकरणाने जो प्रस्ताव दिला आहे त्यामध्ये पेट्रोलचे दर 14.38 रुपयांची वाढ, डिझेल 4.89 रुपये प्रती लीटर वाढण्याची शक्यता आहे. तसेच रॉकेलच्या किंमतीत 7.45 रुपये आणि हलक्या डिझेल ऑईलची किंमत 6.41 रुपयांनी वाढविण्याच येणार आहे.
नव्या प्रस्तावानुसार पेट्रोलची किंमत 113.26 रुपये आणि डिझेलची 122.32, हलक्या डिझेल ऑईलची 86.94 आणि रॉकेलची किंमत 96.76 रुपये एवढी होणार आहे.
यंदाचा रमजानचा महिना पाकिस्तानी नागरिकांना महागाईमध्येच साजरा करावा लागणार आहे. सध्या बाजारात फळभाज्या, दूध आणि औषधेही महाग झाली आहेत. गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये महागाई दर 9 टक्के झाला होता.