इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:59 PM2024-05-20T23:59:42+5:302024-05-20T23:59:54+5:30
Ibrahim Raisi Death: इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र ३ प्रमुख दाव्यांची सध्या संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. अझरबैजान येथील एक कार्यक्रम आटोपून इराणमध्ये परतत असताना रईसी यांचं हेलिकॉप्टर दुर्धटनाग्रस्त झालं. त्यांच्याशी असलेला संपर्क तुटल्यानंतर तातडीने बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती. अनेक तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर रईसी यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. तसेच या दुर्घटनेत रईसी यांचा मृत्यू झाल्याचं वृत्तही समोर आलं. मात्र रईसी यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र ३ प्रमुख दाव्यांची सध्या संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे.
यातील पहिला दावा आहे तो म्हणजे हवामान आणि दुसरा दावा इस्राइलबाबत आहे. इराणच्या राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर जिथे अपघातग्रस्त झालं तो भाग पर्वतीय परिसर आहे. अपघात झाला तेव्हा प्रतिकूल हवामान होते. तसेच पाऊस आणि धुकेही होते. याच खराब हवामानामुळे रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रईसी यांच्या मृत्यूबाबत करण्यात येत असलेल्या दुसऱ्या दाव्यानुसार इस्राइल आणि इराण हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. तसेच दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे बिघडलेले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्लेही केलेले आहेत. त्यामुळे इस्राइलच्या मोसाद ह्या गुप्तहेर एजन्सीने रईसी यांच्या हेलिकॉप्टरला लक्ष्य केलं असावं, अशा दावा केला जात आहे.
मात्र रईसी यांच्या मृत्यूबाबत करण्यात येत असलेला तिसरा दावा आणखीनच धक्कादायक आहे. हा दावा आहे इराणधील सत्तासंघर्षाबाबत. इब्राहिम रईसी याच्या मृत्युमुळे इराणमधील अनेक नेत्यांना राजकीय फायदा होणार आहे. आता इराणमध्ये पुढच्या ५० दिवसांत मतदान होणार आहे. तसेच तोपर्यंत उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर कामकाज पाहतील. इराणच्या राजकारणात सुप्रीम लीडर हे सर्वोच्च स्थानी आहेत. तर राष्ट्रपतींकडे मर्यादित शक्ति असतात. राष्ट्रपती बनल्यापासून रईसी यांची लोकप्रियता सातत्याने घटत चालली होती. दरम्यान, रईसींच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेमागे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांचे पुत्र मोजताबा खोमेनी यांचा हात असल्याचा दावा करण्यात ययेत आहे.
इराणमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. रईसी यांच्या मृत्यूनंतर आता ही बाब केवळ राष्ट्रपतीपदापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. रईसी यांना अयातुल्ला खोमेनी यांचा उत्तराधिकारी मानलं जात होतं. मात्र आता चित्र बदललं आहे. कर्करोगाचा सामना करत असलेल्या खोमेनी यांचं वय आता ८५ वर्षे एवढं झालं आहे. आता त्यांचा वारसदार कोण असेल याबाबत शोध सुरू झाला आहे. मात्र आता रईसी यांच्या मृत्यूमुळे खोमोनींचे पुत्र मोजताबा खोमेनी यांच्यासाठी काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत.
१९८९ मध्ये अयातुल्ला खोमेनी सर्वोच्च नेते बनले होते. त्यावेळी त्यांना कुणी प्रतिस्पर्धी नव्हता. इराणच्या राजकारणात इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सचा (आयआरजीसी) हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर असतो. रईसी हे यांना आयआरजीसीमध्ये खूप लोकप्रिय होते. तर अयातुल्ला खोमेनी यांचे पुत्र मोजताबा यांना आयआरजीसी फारसे पसंद करत नव्हते. मात्र अयातुल्ला खोमेनी यांच्यासह काही मौलवींचा मोजताबा यांना पाठिंबा आहे. मात्र आयआरजीसीने हस्तक्षेप केल्यास मोजताबा यांच्या अडचणी वाढू शकतात.