नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चीनच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अनौपचारिक भेट घेतलीय. 'चीनचे अध्यक्ष माझ्या स्वागतासाठी दोनदा बीजिंगच्या बाहेर आले, याचा भारताला अभिमान वाटतो,' असं मोदींनी म्हटलं. चीनच्या अध्यक्षांनी दोनवेळा बीजिंगबाहेर येऊन माझं स्वागत केलंय. असं स्वागत होणारा मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे, असंही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची वुहान प्रांतातील इस्ट लेक येथील अतिशय नयनरम्य अतिथीगृहात भेट झाली. यावेळी मोदी यांनी जिनपिंग यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं. 'भारत आणि चीनवर जगातील 40 टक्के लोकसंख्येची जबाबदारी आहे,' असंही मोदींनी यावेळी म्हटलं. भारत आणि चीननं एकमेकांना सहकार्य करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. मोदींच्या या आवाहनाला चीनच्या अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 'जगाच्या विकासात चीन आणि भारतानं महत्त्वाचं योगदान देण्याची आवश्यकता आहे,' असं जिनपिंग यांनी म्हटलं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात चीन आणि भारतीय सैन्य डोकलाममध्ये आमनेसामने आलं होतं. भारत, चीन आणि भूतान सीमेवर असलेल्या डोकलामध्ये 73 दिवस दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले होते. या पार्श्वभूमीवरील मोदी आणि जिनपिंग यांची ही पहिली भेट होती. या भेटीत मोदींनी चीनच्या अध्यक्षांचं तोंडभरुन कौतुक केलं. 'अनौपचारिक भेटीचं आयोजन करुन चीननं चर्चेसाठी अतिशय पूरक वातावरण तयार केलंय. जिनपिंग यांनी उचललेलं हे पाऊल अतिशय स्तुत्य आहे,' असं मोदींनी म्हटलं.
...असा मी पहिलाच भारतीय पंतप्रधान- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 5:40 PM