महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी चीनला पुन्हा आली डोकलामची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 06:33 PM2017-12-19T18:33:50+5:302017-12-19T18:36:15+5:30
भारत आणि चीनचे लष्कर आमने सामने आल्याने निर्माण झालेला डोकलाम विवाद मिटून आता चार महिने उलटले आहे. मात्र या प्रकरणात भारताच्या पवित्र्यामुळे झालेली कोंडी चीनला अद्याप विसरता आलेली नाही.
बीजिंग - भारत आणि चीनचे लष्कर आमने सामने आल्याने निर्माण झालेला डोकलाम विवाद मिटून आता चार महिने उलटले आहे. मात्र या प्रकरणात भारताच्या पवित्र्यामुळे झालेली कोंडी चीनला अद्याप विसरता आलेली नाही. त्यामुळे डोकलाम विवादाची खपली काढून या वादाची आठवण कायम ठेवण्याच प्रयत्न चीनकडून करण्यात येत असतो. आताही भारत आणि चीनमध्ये होणाऱ्या एका महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी चीनला डोकलाम विवादाची आठवण आली आहे. डोकलाम विवाद हा भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांची कसोटी होती. त्यातून आपल्याला धडा शिकला पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्यापासून वाचता येईल, असे चीनने म्हटले आहे. चीनने हे वक्तव्य भारत आणि चीनमधील सीमाविवादासंदर्भात होणाऱ्या 20व्या फेरीतील बैठकीपूर्वी केले आहे. ही बैठक भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे स्टेट कांउन्सिलर यांग जेची यांच्यात ही बैठक होणार आहे.
मात्र 22 डिसेंबरला होणाऱ्या या बैठकीबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला डोकलाम विवाद 78 दिवस चाललेल्या तणावानंतर 28 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला होता. आता 22 डिसेंबरला चर्चा झाल्यास डोकलाम विवाद संपुष्टात आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमाप्रश्न सोडवण्यासाठी झालेली ती पहिली अधिकृत बैठक ठरेल.
दरम्यान, डोकलामवरून भारत व चीन यांच्यातील वाद शमल्याचे वातावरण निर्माण झाले असले तरी, आजही डोकलामध्ये चीनचे १८00 सैनिक तैनात आहेत. त्यामुळे कडाक्याच्या थंडी व बर्फवृष्टीत भारताला प्रथमच तिथे आपले सैन्य ठेवण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे, तर भारताने त्या भागातून आपले सैन्य कमी केल्यानंतर चीनने तिथे नवे रस्तेही बांधले आहेत, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
चीनने गेल्या दोन महिन्यांत डोकलाममध्ये नवे रस्ते बांधले असल्याचे सॅटेलाइट चित्रांवरूनच उघड झाले आहे. भारताच्या बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन(बीआरओ) प्रमाणे चीनची चीन रोड वर्कर्स नावाची जी संस्था आहे, तिने त्या भागांत काही रस्ते नव्याने बांधले आहेत, तर काही रस्त्यांचा विस्तार केला आहे. ज्या भागांत अडीच महिन्यांपूर्वी भारत व चीनी सैनिक जिथे एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र होते, तेथून जवळच हे रस्ते आहेत. त्यातील दोन रस्त्यांचे काम आॅक्टोबरच्या तिसºया आठवड्यात सुरू करण्यात आले होते. ते आता पूर्ण झाले आहे.
चीन व भारत या दोघांनी डोकलाममधून आपले सैन्य कमी करावे, असे दोन देशांत ठरल्याचे सांगण्यात आले होते. भारताने सैन्य माघारी घेतल्याबद्दल चीनने समाधान व्यक्त केले होते, तर चीनचे सैन्य कमी केल्यानंतर हा भारताचा विजय असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते.