कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : शनिवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऑस्ट्रेलियात सत्तापालट झाला असून पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी पराभव स्वीकारला आहे. या निवडणुकीत अल्पमतातील सरकार येण्याची शक्यता आहे.
अजून लक्षावधी मतांची मोजणी बाकी आहे. तथापि, कल स्पष्टपणे सरकारच्या विरोधात असल्यामुळे स्कॉट मॉरीसन यांनी पराभव स्वीकारला. मंगळवारी अमेरिका, जपान आणि भारत यांच्या नेत्यांसोबत होणाऱ्या टोकिओ शिखर परिषदेस उपस्थित राहणे मॉरीसन यांच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मतमोजणी सुरू असतानाच त्यांनी पराभव स्वीकारल्याचे जाहीर केले.
मॉरीसन यांनी म्हटले की, ‘देशात निश्चितता असावी, असे मी मानतो. देश पुढे जात राहणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. या सप्ताहात होत असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकांच्या पार्श्वभूमीवर सरकारबाबत स्पष्टता असणे महत्त्वाचे आहे, असे माझे मत आहे.’ सध्याचे विरोधी पक्षनेते अँथनी अलबनीज हे नवे पंतप्रधान होतील. त्यांच्या लेबर पार्टीला २००७ नंतर प्रथमच यश मिळत आहे. लेबर पार्टीने नागरिकांना अधिक वित्तीय साह्य आणि मजबूत सामाजिक सुरक्षेचे आश्वासन दिले होते. २००१ नंतरची सर्वाधिक महागाई आणि घरांच्या वाढत्या किमती यामुळे हैराण असलेल्या ऑस्ट्रेलियाई नागरिकांना या आश्वासनाने भुरळ घातली.
पक्षीय बलाबलn १५१ सदस्यीय प्रतिनिधिगृहात काठावरील बहुमतासाठी ७६ जागांची गरज आहे. n शनिवारी सकाळच्या मतमोजणीनुसार, आघाडी ३८ जागा जिंकण्याच्या स्थितीत होती. n याशिवाय लेबर पार्टी ७१ जागी, तर अपक्ष ७ जागांवर आघाडीवर होते.