CoronaVirus News: घरातल्याच व्यक्तींकडून संसर्गाचा अधिक धोका; रुग्णांत किशोरवयीन मुले, वृद्धांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 11:21 PM2020-07-22T23:21:39+5:302020-07-22T23:21:44+5:30

द. कोरियातील पाहणीचा निष्कर्ष

Increased risk of infection from household members; Patients include adolescents and the elderly | CoronaVirus News: घरातल्याच व्यक्तींकडून संसर्गाचा अधिक धोका; रुग्णांत किशोरवयीन मुले, वृद्धांची संख्या अधिक

CoronaVirus News: घरातल्याच व्यक्तींकडून संसर्गाचा अधिक धोका; रुग्णांत किशोरवयीन मुले, वृद्धांची संख्या अधिक

Next

सेऊल : कोणालाही बाहेरच्या व्यक्तींपेक्षा घरातल्याच लोकांकडून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, असा निष्कर्ष दक्षिण कोरियाच्या संसर्गरोगतज्ज्ञांनी एका पाहणीतून काढला आहे. या पाहणीवर आधारित एक लेख यूएस सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (सीडीसी) नियतकालिकात १६ जुलै रोजी प्रसिद्ध झाला आहे.

दक्षिण कोरियाच्या संसर्गरोग तज्ज्ञांनी केलेल्या या पाहणीत ५७०६ कोरोना रुग्णांचा तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या ५९,००० जणांचा समावेश करण्यात आला होता. त्यातील दर शंभर रुग्णांपैकी दोन जणांनाच बाहेरच्या व्यक्तींकडून कोरोना विषाणूची लागण झाली होती.

मात्र दर दहा रुग्णांपैकी एकाला त्याच्या घरच्या मंडळींमुळेच कोरोना झाला होता, असे आढळून आले. अशा रुग्णांमध्ये किशोरवयीन मुले किंवा ६० ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्तींचे जास्त प्रमाण आहे. या दोन वयोगटांतल्या व्यक्ती घरातल्या लोकांशी सतत संपर्कात असल्यामुळे त्यांची संख्या जास्त असावी, असे कोरिया सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे संचालक जिआँग एऊन क्याँग यांनी सांगितले.

हॅलिम युनिव्हर्सिटी कॉलेज आॅफ मेडिसिनचे सहायक प्राध्यापक डॉ. चो यूंग जून यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग झाला असूनही त्याची कोणतीही लक्षणे आढळून न येण्याचे प्रमाण प्रौढ व्यक्तींपेक्षा लहान मुलांमध्ये अधिक आहे. मुलांकडून इतर लोकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण खूप कमी असावे असे वाटते. मात्र, ती गोष्ट सिद्ध करणारा सबळ पुरावा या पाहणीत मिळाला नाही.

दक्षिण कोरियात कोरोनाविषयक केलेल्या पाहणीसाठी २० जानेवारी ते २७ मार्च या कालावधीत माहिती गोळा करण्यात आली होती. याच कालावधीत दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला होता व ही साथ कळसाला पोहोचली होती.
दक्षिण कोरियामध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या 13800 पेक्षा अधिक असून आतापर्यंत 297 जणांचा बळी गेला आहे.

Web Title: Increased risk of infection from household members; Patients include adolescents and the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.