पाकिस्तान आग लावणारा देश; संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 07:10 AM2021-09-26T07:10:48+5:302021-09-26T07:11:35+5:30

पाकिस्तानच्या धोरणामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होत असल्याचं म्हणत दुबे यांचा हल्लाबोल.

india first secretary sneha dubey slams pakistan pm imran khan unga terrorism | पाकिस्तान आग लावणारा देश; संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी खडसावले

पाकिस्तान आग लावणारा देश; संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी खडसावले

Next
ठळक मुद्देपाकिस्तानच्या धोरणामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होत असल्याचं म्हणत दुबे यांचा हल्लाबोल.

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रे महासभेत (यूएनजीए) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवल्यावर भारताने प्रत्युत्तरात हल्लाबोल केला की, पाकिस्तान एक असा देश आहे जिथे अतिरेकी बिनधास्त ये-जा करतात. हा देश आग लावणारा आहे. मात्र, स्वत:ला आग विझविणारा असल्याचा दिखावा करतो. त्यांच्या धोरणांमुळे पूर्ण जगाचे नुकसान होत आहे. कारण, ते अतिरेक्यांना आश्रय देत आहेत. 

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे महासभेत बोलताना म्हणाल्या, आम्ही असे ऐकत आलो आहोत की, पाकिस्तान दहशतवादाचा शिकार आहे. वस्तुस्थिती ही आहे की, या देशाने स्वत: आग लावली आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना केवळ या अपेक्षेने आश्रय देतो की, जेणेकरून शेजारी देशांचे नुकसान करता येईल. आपल्या देशातील जातीय हिंसाचाराला ते अतिरेकी कारवायांचे नाव देत लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय आणि पाकिस्तान समर्थक फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाबाबत चर्चा केली होती. यावर बोलताना दुबे म्हणाल्या की, जम्मू- काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. यात पाकिस्तानच्या अवैध ताब्यातील भागाचाही समावेश आहे. तो भाग त्यांनी त्वरित रिकामा करावा, असे आवाहन आम्ही करतो. 

दुबे म्हणाल्या की, पाकिस्तानात अल्पसंख्याक शीख, हिंदू, ख्रिश्चन सतत भीतीच्या छायेत आहेत. याउलट भारत अल्पसंख्याकांच्या मोठ्या लोकसंख्येचा लोकशाही देश आहे. भारत एक स्वतंत्र मीडिया आणि न्यायपालिकेचा देश आहे. 

कोण आहेत स्नेहा दुबे? 

  • संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांचे शिक्षण गोव्यात झाले आहे. त्यांना प्रवासाची प्रचंड आवड आहे. पुण्याच्या फर्ग्यूसनमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर नवी दिल्लीत जेएनयूतून जियॉग्राफीत मास्टर्सची पदवी प्राप्त केली.
  • जेएनयूतून स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये एमफिल पूर्ण केले. २०११ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण केली. 
  • वडील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. आई शिक्षिका आहे. तर, भाऊ व्यावसायिक आहेत. आयएफएस होण्याचे स्वप्न साकार करत आज त्या संयुक्त राष्ट्रांत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. 


अतिरेक्यांना मदत करणे हा त्यांचा इतिहास
९/११ च्या अतिरेकी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करून दुबे म्हणाल्या की, या घटनेचा कट करणारा ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात आश्रय मिळाला होता हे जग विसरलेले नाही.

आजही पाकिस्तानी नेतृत्व त्याला शहीद संबोधते. अतिरेक्यांना आश्रय देणे, त्यांना मदत करणे आणि त्यांचे उघड समर्थन करणे हा पाकिस्तानचा इतिहास आहे. पाकिस्तानकडून अतिरेक्यांना प्रशिक्षण आणि पैसा, शस्त्र दिले जातात हेही जगाला ठाऊक आहे. 

Web Title: india first secretary sneha dubey slams pakistan pm imran khan unga terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.