वॉशिंग्टन, दि.19- अमेरिकेन कॉंग्रेसने तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठविल्यानंतर भारताने 10 कोटी डॉलर किंमतीच्या तेलाची खरेदी केली आहे. या तेलाचे जहाज अमेरिकेतून भारताच्या दिशेने निघाले असून सप्टेंबर महिन्यामध्ये ते भारतात येण्याची शक्यता आहे. 2016 साली अमेरिकेने तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवली. ओबामा सरकारच्या काळामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. उत्तर डाकोटा आणि अलास्कासारख्या तेलउत्पादक राज्यांनी ही बंदी उठवली जावी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयाची फळे आता भारतासारख्या देशांसाठी मूर्त स्वरुपात दिसू लागली आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यातील भेटी आणि चर्चेनंतर भारतीय कंपन्यांना अमेरिकन तेल आयातीसाठी परवानगी देण्यात आली. इंडियन ऑइल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशनने(बीपीसीएल) चाळीस लाख बॅरल्स तेलाची मागणी अमेरिकेकडे नोंदविली आहे. इंडियन ऑइलने जून महिन्यातच तेलाची मागणी नोंदवली तर 10 ऑगस्ट रोजी दुसऱ्या मागणीची नोंद केली. बीपीसीएलने 5 लाख बॅरल मार्स आणि पोसिडॉनची नोंदवलेल्या मागणीनुसार हे पेट्रोपदार्थ 26 सप्टेंबर आणि 10 ऑक्टोबररोजी भारतात पोहोचतील. या कंपन्यांबरोबर हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडही अमेरिकन तेलाची खरेदी करण्याची शक्यता आहे. अमेरिकेने आपले अंतर्गत तेलाचे उत्पादन वाढवल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती झपाट्याने घसरल्या आहेत. व्हेनेझुएलासारख्या केवळ तेलाच्या निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या देशांना याची मोठी झळ सहन करावी लागली. आता अमेरिकेने तेलाची निर्यात सुरु केल्यावर या देशांवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.
रशिया-सौदीमुळे कच्चे तेल घसरलेतेलाच्या निर्यातीवर बंदी का होती ?तेलाच्या किंमतीतील चढउतारावर परिणाम करणाऱ्या ओपेक संघटनेला शह देण्यासाठी अमेरिकेने 1975 साली आपल्या देशातील तेल उत्पादकांना तेलाची निर्यात करण्यासाठी बंदी घातली. त्यामुळे अमेरिकेचे देशांतर्गत तेलाचे दर कमी राहण्यास मदत होणार होती. मात्र तेल उत्पादक कंपन्यांवर कालांतराने याचा परिणाम होऊ लागला. तेलाचे वाढते उत्पादन आणि ज्या प्रकारचे तेल उत्पादित झाले आहे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम नसणाऱ्या रिफायनरी यामुळे नवे ग्राहक शोधण्याची गरज होतीच. अमेरिकेतील तेल उत्पादक राज्यांनीही बंदी उठवण्याची मागमी लावून धरली होती.
भारत हा जगातील तेल आयात करणारा जगातील तिसऱ्या क्रमाकांचा देश आहे. चीन, द. कोरिया आणि जपाननंतर भारत हा आशियातील अमेरिकचे तेल खरेदी करणारा चौथा देश बनला आहे. आता भारतात पहिल्या खेपेत येणारे 2 लाख बॅरल तेल 10 कोटी डॉलर्स किंमतीचे आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेतील द्वीपक्षीय व्यापार 2 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचणार आहे. हे तेल 6 ते 14 ऑगस्ट या काळात अमेरिकेतून निघाले असून ओडिशातील पराद्वीपमध्ये पोहोचेल.