अमेरिकेने सोडले भारतावर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:22 AM2019-05-09T04:22:03+5:302019-05-09T04:22:37+5:30
उच्च आयात कर, अतिप्रतिबंधात्मक प्रवेश अडथळे आणि सहन करावी लागणारी व्यापारातील तूट याबद्दल अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांनी भारतावर टीकास्त्र सोडले.
नवी दिल्ली : उच्च आयात कर, अतिप्रतिबंधात्मक प्रवेश अडथळे आणि सहन करावी लागणारी व्यापारातील तूट याबद्दल अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांनी भारतावर टीकास्त्र सोडले. अॅमेझॉनसारख्या ई-वाणिज्य कंपन्यांना डाटा भारतातच साठविण्याची सक्ती करणाऱ्या प्रस्तावित नियमाबाबतही रॉस यांनी नापसंती व्यक्त केली आहे.
येथे आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत रॉस यांनी म्हटले की, सध्या भारतीय बाजारात प्रवेश करण्यासाठी अमेरिकी व्यवसायांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. कर आणि करेतर अडथळ्यांचा त्यात समावेश आहे. भारताचा सरासरी आयात कर १३.८ टक्के आहे. जगातील कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत हा दर खूपच अधिक आहे. खरे तर हा कर सर्वांत जास्त आहे. भारताच्या प्रतिबंधात्मक अडथळ्यांमुळे अमेरिकेची भारतातील निर्यात वाढत नाही. याउलट अमेरिका मात्र भारताची सर्वांत मोठी निर्यात बाजारपेठ आहे.