वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं नेतृत्व करणा-या प्रतिनिधीनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. वायफळ बडबड केल्यानं कधीही सत्य परिस्थिती बदलत नसते, असं म्हणत भारतानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानं भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलिहा लोदी यांनी महासभेत हिंसाचार, जातीय वाद या विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या नरसंहाराचा हवाला दिला. त्यावर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी संदीप कुमार बाय्यपू यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, गेल्या एक दशकापासून संवेदनशील असलेल्या काश्मीरच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा होतेय. त्याच वेळी पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं भारतातल्या जम्मू-काश्मीरचा चुकीच्या पद्धतीनं हवाला देत मंचाचा दुरुपयोग केला आहे. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची पाकची कूटनीती नेहमीच अयशस्वी राहिली आहे आणि त्या देशाला कोणाचंही समर्थन मिळालेलं नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे पाकिस्ताननं कितीही वायफळ बडबड केली तरी सत्य परिस्थिती बदलणार नाही, असंही संदीप म्हणाले आहेत.
वायफळ बडबड केल्यानं सत्य बदलत नाही, संयुक्त राष्ट्रात भारताची पाकला चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 12:14 PM