अतिरेक्यांविरुद्ध कारवाईचा भारत-अमेरिकेचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 07:25 AM2021-09-26T07:25:27+5:302021-09-26T07:26:00+5:30
मोदी-बायडेन भेटीनंतर निवेदन जारी.
वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या गटांसह सर्व दहतवादी गटांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार भारत आणि अमेरिका यांनी व्यक्त केला आहे. दहशतवादाचा निषेध करतानाच २६/११ च्या मुंबई अतिरकी हल्ल्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे दोन्ही देशांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी व्हॉइट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक घेतली. त्यानंतर दोन्ही देशांच्या वतीने एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका जागतिक दहशतवादाच्या विरोधात एकत्रितपणे उभे आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध समितीने दहशतवादी घोषित केलेल्या गटांस सर्व दहशतवादी गटांविरुद्ध ठोस कारवाई करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला आहे. सीमापार दहशतवादाचा आम्ही निषेध करतो तसेच २६/११ च्या मुंबई अतिरेकी हल्ल्यातील सर्व आरोपींना शिक्षा व्हायला हवी.
इतिहास काय सांगतो?
१६६ जणांचा बळी घेणारा मुंबई अतिरेकी हल्ला लष्कर-ए-तोयबाने घडवून आणला होता. पाकिस्तानचा कुख्यात धर्मगुरू हाफिज सईद याची जमात-उद-दावा ही संघटना तोयबाचीच एक आघाडी आहे. सईदला संयुक्त राष्ट्रांनी अतिरेकी घोषित केले असून त्याच्या शिरावर १० दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. त्याला पाकिस्तानच्या लाहोर शहरातील कोट लखपत तुरुंगात कडक सुरक्षेत ठेवण्यात आले आहे.