वाशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्याला अद्यापही विसरले नाहीत. विशेष म्हणजे ट्रम्प कुटुंबीयांनाच भारत दौऱ्याची सातत्याने आठवण होत आहे. अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलाईना येथील एका रॅलीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 15 हजार लोकं जमली होती. मात्र, स्वागताला केवळ 15 हजारच लोक जमल्याचं दु:ख ट्रम्प यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवलं. विशेष म्हणजे भारतात माझ्या स्वागताला तब्बल 1 लाख लोक आले होते, असेही ट्रम्प यांनी यावेळी बोलून दाखवले.
ट्रम्प यांनी रॅलीला संबोधित करताना भारत दौऱ्यातील स्वागताचा उल्लेख केला. भारतात माझ्या स्वागताल लाख लोकं जमले होते. मला ही गोष्ट सांगायला खेद वाटत आहे की, भारतात 1 लाख 29 हजारांची संख्या असलेल्या स्टेडियममध्ये किती लोकं जमली होती, तुम्ही पाहिलं ना? सगळीकडे गर्दी दिसत होती. जवळपास 1 लाख लोकं तेथे आले होते. ते क्रिकेट स्टेडियम होते, विशेष म्हणजे यापेक्षा तिप्पट मोठे, असेही ट्रम्प यांनी आपल्या भाषणात म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान व्यक्तीमत्व असून देशातील नागरिक त्यांच्यावर खूप प्रेम करतात. येथेही चांगलीच गर्दी जमली आहे, मला गर्दी जमलेली आवडते. भारतात 125 कोटी लोकसंख्या आहे, तर अमेरिकेत 35 कोटी, असे ट्रम्प यांनी म्हटले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावयासह दोन दिवसीय भारत दौरा केला. या दौऱ्यात आग्र्याच्या ताजमहाल आणि अहमबाद येथील साबरमती आश्रमालाही भेट दिली. डोनाल्ड यांनी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडीयमध्ये भाषणही केले. या भाषणाला जवळपास 1 लाख लोकांची हेजरी होती. त्यामुळेच, आपल्या स्वागताने ट्रम्प कुटुंबीय पंतप्रधान मोदी आणि भारतावर खुश झाले आहे. या दौऱ्यात मेलानिया यांनी दिल्लीतील शाळांना भेट देत ‘हॉप्पीनेस क्लास’ची संकल्पना समजून घेतली होती. मायदेशी परतल्यानंतर मेलानिया यांनीही ट्विटरवरून या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या ट्विटला हजारो फॉलोअर्सनी पसंती दिल्यामुळे दिल्लीतील शाळामधील हा उपक्रम जगभरात पोहोचला आहे. तर, ट्रम्प यांनीही अमेरिकेतील भाषणात भारत भेटीचा उल्लेख केला.