बीजिंग - भारत आणि चीनमध्ये डोकलावरुन सुरु असलेला वाद थांबायचं नाव नाही घेत आहे. दरम्यान चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्रात डोकलाममधील रस्ता आणि इतर बांधकामं सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारताकडून यासंबंधी देण्यात येणारी प्रतिक्रिया विचित्र आहे असंही लेखात म्हटलं आहे. या लेखात भारताचा वेडा असा उल्लेख करण्यात आला असून, गर्विष्ठ असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने चुंबी खो-यात एका रस्त्याचं बांधकाम सुरु केलं असून, हा परिसर भारत आणि चीनमधील वादग्रस्त ठिकाणाहून फक्त 10 किमी अंतरावर आहे असे रिपोर्ट्स समोर आल्यानंतर उत्तरादाखल हा लेख लिहिण्यात आला आहे.
लेखात चीनने डोकलाममध्ये कोणतंही नवं बांधकाम सुरु केला नसल्याचा दावा केला आहे. मात्र याचं कारण वेगळं सांगण्यात आलं आहे. लेखानुसार, सध्या बांधकाम करण्यासाठी योग्य हवामान नाही. सोबतच, या क्षेत्रात बांधकाम करण्याचे पुर्ण अधिकार चीनकडे असल्याचा दावाही लेखातून करण्यात आला आहे. डोकलाम चीनचा भाग असून, चीन सरकारच्या नियंत्रणात आहे असा दावाही करण्यात आला आहे.
चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी डोकलाम नाथु-ला क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून या दौºयाच्या निमित्ताने प्राप्त झाली.
भारत-चीन दरम्यानच्या सीमावर्ती भागात १00 पेक्षा अधिक खिंडी आहेत व त्यापैकी ९० टक्के खिंडी एवढ्या दुर्गम भागात आहेत की, तेथे जाण्यासाठी रस्तेच अस्तित्वात नाहीत. सिक्कीम जवळच्या नाथू-ला खिंडीप्रमाणे सीमावर्ती भागातील प्रत्येक खिंडीपाशी पायाभूत सुविधा तयार असाव्यात व त्यामुळे या क्षेत्रात भारतीय सैन्यदलांच्या हालचाली अधिक सुकर व्हाव्यात, अशी सरकारची रणनीती आहे. अरुणाचल प्रदेश, ईशान्य भारतात चीनला लागूून असलेल्या सीमेवर, तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आदी राज्यातल्या सीमावर्ती भागात २0२२ पूर्वी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते बांधण्याची तयारी त्यासाठीच भारत सरकारने चालविली आहे. अशी माहिती या सूत्रांकडून प्राप्त झाली.