वॉशिंग्टन- अमेरिकेतील अॅरिझोनामधील फिनिक्स येथे विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये सहा व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये एका भारतीय व्यक्तीचा समावेश आहे. आनंद पटेल असे या 26 वर्षीय व्यक्तीचे नाव असून 'व्हॉटस हॅपी क्लोदिंग' नावाची कंपनी ते चालवत होते.लास वेगास येथे जाणारे पायपर पीए-24 कोमान्शे हे विमान स्कॉटस्डेल गोल्फ कोर्सवर उड्डाण केल्यावर 15 मिनिटांमध्येच कोसळले. जमिनीवर कोसळताच क्षणार्धात त्यास आग लागली आणि विमानातील सर्व 6 प्रवासी मृत्युमुखी पडले. आनंद पटेल हे त्यांच्या मित्रांमध्ये 'हॅपी' नावाने ओळखले जात असत. 2009 साली त्यांचा जुळा भाऊ आकाश पटेल याच्याबरोबर ते अमेरिकेत शिक्षणासाठी गेले होते. त्यांनी या 'व्हॉटस हॅपी क्लोदिंग' कपड्याच्या कंपनीची स्थापना करुन तिचे प्रवर्तक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या विमान अपघाताचे कारण अद्याप समजलेले नसून नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन याचा अधिक तपास करत आहे.
अमेरिकेतील विमान दुर्घटनेत भारतीय वंशाच्या तरुण उद्योजकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 12:59 PM