अमेरिकेला मागे टाकणार भारतीय अर्थव्यवस्था!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:03 AM2018-09-20T00:03:12+5:302018-09-20T06:44:20+5:30
२०५० पर्यंत होणार भरभराट; संशोधन-विकास आणि मनुष्यबळ वापराचे मात्र आव्हान
नवी दिल्ली : जागतिक आर्थिक आणि रणनीतिक सत्ताकेंद्र हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. जगातील चार मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी तीन अर्थव्यवस्था आशिया-प्रशांत क्षेत्रातील आहेत. २०२५ पर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी दोनतृतीयांश लोकसंख्या याच क्षेत्रात राहील. या क्षेत्रात भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असून, २०५० पर्यंत ती अमेरिकेलाही मागे टाकील, असे एका अहवालात म्हटले आहे.
लोयी इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, अमेरिकेची शक्ती क्षीण होत असली तरी, आशिया-प्रशांत विभागात अजूनही अमेरिकेचा प्रचंड प्रभाव आहे. या विभागात एकूण २५ प्रभावशाली देश आहेत ज्यात भारत चौथ्या तर पाकिस्तान १४ व्या स्थानी आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत व चीन यांच्यात असलेली मोठी दरी भरून काढणे भारताला नजीकच्या काळात तरी शक्य होणार नाही. पण आगामी ११ वर्षांत भारत अमेरिकेच्या जवळ पोहोचलेला असेल. २०५० सालापर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकेल.
मात्र भारताच्या मार्गात काही अडथळे आहेत. उत्पादन क्षमता, संशोधन व विकास या मापदंडांत भारत खूपच मागे पडत आहे. साधने आणि मनुष्यबळ यांचा पूर्ण वापर करणे भारताला शक्य होताना दिसत नाही, असे अहवालात म्हटले आहे.
११४ मापदंडांच्या आधारे
विविध देशांच्या अर्थव्यवस्थांबाबतचा हा अहवाल तयार करण्यासाठी ११४ मापदंड निश्चित करण्यात आले होते. अर्थव्यवस्था, लष्कर, मुत्सद्देगिरी आणि सांस्कृतिक प्रभाव या क्षेत्रांचा विचार त्यासाठी करण्यात आला. याच मुद्यांच्या आधारे कोणता देश किती प्रभावशाली आहे, हे ठरविण्यात आले.