मेलबर्न : न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्त रवी थापर यांना नवी दिल्लीला माघारी बोलाविण्यात आले आहे. थापर यांच्या पत्नीवर एका कर्मचाऱ्याचा छळ केल्याचा आरोप झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले असून या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरणाच्या चौकशीसाठी गेल्या महिन्यात एक स्वतंत्र पथक न्यूझीलंडला पाठविले होते. या पथकाने दिलेल्या अहवालाच्या आधारे थापर यांची घरवापसी करण्यात आली. पीडित एक स्वयंपाकी असून तो उच्चायुक्तांच्या वेलिंग्टन येथील घरी काम करत होता. एका रात्री त्याने घरातून धूम ठोकली आणि पायी २० कि. मी. अंतर पार केले. तो परेशान दिसत होता. त्याला पोलिसांनी ठाण्यामध्ये नेले व त्यानंतर त्याने अनेक दिवस अनाथांसाठीच्या निवाऱ्यात काढले. आपल्याला डांबून ठेवण्यात आले होते व उच्चायुक्तांची पत्नी आपला छळ करत होती, असा आरोप त्याने केला. उच्चायुक्त कार्यालयाच्या सेवा कर्मचारी दलाचा एक कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती सर्वप्रथम १० मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाला मिळाली होती, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. या कर्मचाऱ्याने कोणतीही तक्रार दिलेली नाही. परराष्ट्र मंत्रालय या प्रकरणाची चौकशी करणार असून उच्चायुक्तांची नवी दिल्लीत मुख्यालयी रवानगी करण्यात आली आहे, असेही स्वरूप म्हणाले. (वृत्तसंस्था)
न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्तांची घरवापसी
By admin | Published: June 28, 2015 3:41 AM