सुरक्षा परिषदेत भारताची पाकवर टीका; दहशतवाद्यांचे अर्थसाहाय्य रोखण्याच्या प्रस्तावाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 02:34 AM2019-03-30T02:34:52+5:302019-03-30T02:35:42+5:30
अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे.
संयुक्त राष्ट्रे : अतिरेक्यांचे समर्थन करणारे देश आपल्या कारवाईला आणि निष्क्रियतेला योग्य ठरवीत दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील आणि काही सबबी सांगत राहतील, अशा शब्दांत भारतानेपाकिस्तानवर टीका केली आहे.
संयुक्त राष्ट्रांकडून प्रतिबंधित अतिरेकी आणि संस्थांविरुद्ध निर्बंध सक्तीने लागू करण्याचे आवाहनही भारताने सुरक्षा परिषदेकडे केले आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी यावेळी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीकाही केली.
सुरक्षा परिषदेने गुरुवारी सर्वसहमतीने एक प्रस्ताव स्वीकार केला आहे. यात सदस्य देशांना अतिरेकी कार्यासाठी अर्थसाहाय्य रोखण्यासाठी प्रयत्न वाढविण्याबाबत सांगण्यात आले आहे.
भारताने याबाबतचा प्रस्ताव स्वीकार केल्याच्या कृतीचे स्वागत करताना म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या प्रयत्नात हा मैलाचा दगड ठरेल. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबतच्या खुल्या चर्चेत भाग घेताना म्हटले आहे की, दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या प्रस्तावाचे भारत स्वागत करीत आहे.
भारताने पाकिस्तानचा अप्रत्यक्ष उल्लेख करीत म्हटले आहे की, दुर्दैवाने वस्तुस्थिती ही आहे की, दहशतवाद्यांचे समर्थन करणारे देश आपली कारवाई आणि निष्क्रियता योग्य ठरविण्यासाठी दहशतवाद्यांना आश्रय देत राहतील. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी यावेळी मत व्यक्त करीत जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला.