इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने नाकावर टिच्चून बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ उद्धस्त केल्याने पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे. दरम्यान, त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने आज भारतात घुसून प्रतिहल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला. दुसरीकडे पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेली दोन विमाने पाडण्यात आली असून, दोन वैमानिकांना ताब्यात घेतल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. एकीकडे पाकिस्तानकडून भारताची विमाने पाडून त्यातील दोन वैमानिकांना अटक केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यापैकी एक वैमानिक जखमी झाला असल्याचाही दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र मात्र पाकिस्तानने यासाठी दाखवलेले व्हिडिओ आणि पुरावे खोटे असल्याचे समोर आले आहे. तसेच आधी झालेल्या विमान अपघाताचे व्हिडिओ पाकिस्तानकडून शेअर करण्यात आले आहे.
दरम्यान, पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती. भारतीय हवाई दलाच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानचे लष्करी अधिकारी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले की, भारताची दोन विमाने पाडून त्यातील दोन वैमानिकांना अटक केली आहे. पाडण्यात आलेल्या विमानांपैकी एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत तर एक भारताच्या हद्दीत पडले,'' असा दावा त्यांनी केला.