अमेरिकेतील मेन राज्यामधील लेविस्टन येथे एक युवकाने अंदाधुंद फायरिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून 50 ते 60 जण जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास एका सक्रिय शूटरने हा गोळीबार केला.
अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयाने (पोलीस) आपल्या फेसबुक पेजवर संशयिताचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत बंदूकधारी आपल्या खांद्याला बंदूक लावून उभा आहे. तर एक फोटोत आस्थापनेत प्रवेश करताना दिसत आहे आणि सध्या फरार आहे.
पोलिसांनी जारी केला फोटो -पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो जारी करत लोकांकडे मदत मागितली आहे. फोटोमध्ये लांब बाह्यांचा शर्ट आणि जीन्स परिधान केलेली एक दाढी असलेली व्यक्ती फायरिंग रायफलने गोळीबार करताना दिसत आहे. यासंदर्भात, लेविस्टनमधील सेंट्रल मेन मेडिकल सेंटरने एक निवेदन जारी केले असून, या घटनेत " मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. लेविस्टन अँड्रोस्कोगिन काउंटीचा भाग असून मेन मधील सर्वात मोठे शहर असलेल्या पोर्टलँडच्या उत्तरेला जवळपास 56 किमी अंतरावर आहे.
लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन -अँड्रोस्कोगिन काउंटी शेरिफच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात, "आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. आणि सर्व व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन करत आहोत.' मेन डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीच्या एका प्रवक्त्याने नागरिकांना आपल्या घरात दार बंद करून राहण्याचे आवाहनही केले आहे.