Indonesia: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात ? एका आठवड्यात 150 पेक्षा जास्त लहान मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 01:04 PM2021-07-26T13:04:45+5:302021-07-26T13:05:27+5:30
Indonesia Corona updates:देशातील एकूण रुग्णांच्या 12.5 टक्के लहान मुलं आहेत.
जकार्ता: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत जाणकार सतत सतर्क राहण्यास सांगत आहेत. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा दावा विविध तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. आता हा दावा इंडोनेशिया (Indonesia) मध्ये खरा होताना दिसत आहे. इंडोनेशियामध्ये एका आठवड्यात शेकडो मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये 5 वर्षांपेक्षा कमी वयाचे मुलं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या आठवड्यात इंडोनेशियामध्ये 100 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाला आहे.
इंडोनेशियामध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मोठ्यांसोबत लहान मुलांमध्येही कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. देशात शुक्रवारी जवळपास 50 हजार नवी रुग्ण सापडले तर 1,566 रुग्णांचा मृत्यू झाला. इंडोनेशियातील बालरोग तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार, देशातील एकूण रुग्णांच्या 12.5 टक्के लहान मुलं आहेत. याच महिन्यात 11 ते 17 जुलैदरम्यान 150 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाला.
कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत इंडोनेशियात 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 800 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाला आहे. पण, यातील बहुतेक मृत्यू मागच्याच महिन्यात झाले आहेत. रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत, योग्य आरोग्य सुविधा मिळत नाहीयेत. इंडोनेशिया सरकारने लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालयं सुरू केली आहेत, पण तिथेही भरती असलेल्या मुलांची संख्या खूप आहे. रुग्णालयांशिवाय अनेकांना आपल्या घरात क्वारंटाइन व्हावे लागत आहे.